ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. २२ - दलितांनी लग्नसमारंभांमध्ये गौरी-गणपतीचे पूजन करु नये असे वादग्रस्त विधान उत्तरप्रदेशमधील बसप नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले आहे. मनुवादी व्यवस्थेत दलित व मागासवर्गीयांची दिशाभूल करुन त्यांना शासकापासून पुन्हा गुलाम बनवण्याची ही चाल आहे असे मौर्य यांनी म्हटले आहे.
उत्तरप्रदेशमधील विरोधी पक्ष नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी लखनौमधील एका कार्यक्रमात हे वादग्रस्त विधान केले आहे. हिंदू धर्माविषयी वादग्रस्त विधान केल्याने भाजपने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तर बसप प्रमुख मायावती यांनी मौर्य यांचे मत वैयक्तिक असल्याचे स्पष्टीकरण दिले. मायावती म्हणाल्या, बहुजन समाज पक्ष बाबासाहेब आंबेडकर यांनी साकारलेल्या संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या सिद्धांतावर विश्वास ठेवते. बसपला दलित, मागासवर्गीय, उच्चवर्णीय, अल्पसंख्यांक या सर्वांना एकत्र घेऊन समान समाज व्यवस्था निर्माण करायची आहे असे स्पष्टीकरणही मायावतींनी दिले आहे.