नवी दिल्ली : ‘भारतात गोमातेचे रक्षण करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करीत आहोत. संपूर्ण भारतात त्यासाठी गोहत्येवर प्रतिबंध घालणारा कायदा सक्तीने अमलात आला पाहिजे. ही जबाबदारी केंद्र्र सरकारची आहे’, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी रविवारी दिल्लीत केले. राष्ट्रीय स्तरावर ही मागणी अधोरेखित करण्यासाठी त्यांनी दिवस निवडला महावीर जयंतीचा. ‘अहिंसा परमो धर्म’ चे तत्वज्ञान सांगणाऱ्या जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात भागवत बोलत होते.गोहत्या बंदी विषयी रा.स्व. संघाची आस्था व्यक्त करतांना भागवत म्हणाले, भारतात ज्या राज्यांमधे संघाचे समर्पित स्वयंसेवक आहेत, तिथल्या राज्य सरकारांनी गोहत्या बंदीचा कायदा लागू केला मात्र हा कायदा संपूर्ण देशात लागू झाला पाहिजे अशी संघाची इच्छा आहे. गोहत्या प्रतिबंधाच्या नावाखाली राजस्थानात अलवर येथे गोरक्षकांनी एक गाडी अडवून काही लोकांना जबरदस्त मारहाण केली. त्यात पहलू खान नावाच्या दूधव्यावसायिकाचा व्यक्तिचा मृत्यू ओढवला. इतकेच नव्हे तर आक्रमक गोरक्षकांनी देशाच्या विविध भागात तुफान हाणामाऱ्या चालवलेल्या आहेत. देशभर या घटनांचे पडसाद उमटत आहेत. संसदेत व संसदेबाहेर या विषयावर आक्रोशाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर देशव्यापी गोहत्या बंदीची भागवत यांनी केलेली मागणी लक्षणीय म्हणावी लागेल.अलवर येथील घटनेच्या संदर्भात आक्रमक गोरक्षकांबाबत बोलतांना भागवत म्हणाले, गोहत्या बंदीसाठी कोणत्याही प्रकारची हिंसा आम्हाला मंजूर नाही. मूळ अभियान अशा प्रकारांमुळे बाजूलाच रहाते आणि या महत्वाच्या मागणीवर त्याचे दुष्परिणाम ओढवतात. गोमतेच्या रक्षणाचे काम कायद्याच्या चौकटीत राहूनच केले पाहिजे, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
देशव्यापी गोहत्याबंदी हवी
By admin | Updated: April 10, 2017 01:09 IST