नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांतील जनतेने बदल स्वीकारत, भाजपाला मतदान केले़ जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे़ या दोन्ही राज्यांत काँग्रेस एका दक्ष आणि सक्षम विरोधकाची भूमिका पार पाडेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पक्ष उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी दिली़ विजयासाठी भाजपाचे अभिनंदन करतानाच, या पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करतील, अशी अपेक्षाही द्वयींनी व्यक्त केली़महाराष्ट्रातील जनतेने यापूर्वी आमच्यावर सलग तीनदा तर हरियाणातील जनतेने सलग दोनदा विश्वास दाखवला़ आता काँग्रेस पक्ष दोन्ही राज्यांत एका सजग विरोधकाची भूमिका साकारेल़ नवे सरकार जनतेच्या कसोट्यांवर पूर्ण उतरेल, अशी अपेक्षा आहे, असे सोनिया गांधी यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे़ काँगे्रसचे समर्थक आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले आहेत़ राहुल गांधी यांनीही जनतेचा कौल मान्य असल्याची प्रतिक्रिया दिली़ जनतेने बदल स्वीकारला़ विजयासाठी मी भाजपाचे अभिनंदन करतो़ भविष्यात जनतेचा विश्वास संपादन करण्यास पक्ष पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरेल, असे ते म्हणाले़ (प्रतिनिधी)
काँग्रेस नेतृत्वाला जनतेचा कौल मान्य
By admin | Updated: October 20, 2014 06:08 IST