नवी दिल्ली: पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांत कमालीचा विकास झाल्याचा टोला राहुल यांनी लगावला. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये वाढ होत आहे. त्यावरून राहुल यांनी केंद्राला लक्ष्य केलं आहे. 'पेट्रोल, डिझेलच्या किंमतींमध्ये कमालीचा विकास झाला आहे. मोदी सरकार इंधनावरून मोठ्या प्रमाणावर कर लावून जनतेची लूट करत आहे. त्यामुळेच सरकार पेट्रोल-डिझेलवर जीएसटी लागू करत नाही,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. इंधन कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये आज वाढ केली. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर लीटरमागे ८४.२० रुपयांवर पोहोचला. हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे.
पेट्रोल, डिझेलच्या दरात कमालीचा 'विकास' झालाय; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
By कुणाल गवाणकर | Updated: January 7, 2021 17:06 IST