नवी दिल्ली : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला आपण दोघेही पाठिंबा देऊ असा प्रस्ताव काँग्रेसकडून आम्हाला होता, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा हास्यास्पद असल्याचे काँग्रेस म्हटले आहे़राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला संयुक्तपणे पाठिंबा देऊ असा प्रस्ताव काँग्रेसकडून आम्हाला होता, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केला होता़ तथापि हा प्रस्ताव देणारा काँग्रेस नेता कोण हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले होते़ तसेच हा प्रस्ताव व्यवहार्य नसल्यामुळे आम्ही भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, अशी पुस्तीही जोडली होती.काँग्रेस सरचिटणीस अजय माकन यांनी मंगळवारी एक निवेदन जारी करून याबाबत खुलासा केला़ असा कुठलाही प्रस्ताव आम्ही दिलेला नाही़ हे हास्यास्पद आहे़ शिवसेनेसारख्या पक्षाला काँग्रेसने यापूर्वी कधीही पाठिंबा दिला नव्हता आणि भविष्यातही देणार नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे़ याचवेळी राष्ट्रवादीवर त्यांनी जोरदार टीका केली़ राष्ट्रवादीसारखे पक्ष कधीही सत्तेबाहेर राहू शकत नाहीत आणि त्यासाठी ते कुठलीही तडजोड करू शकतात़ मात्र काँग्रेस एका सजग विरोधी पक्षाची भूमिका साकारेल असे ते म्हणाले़
काँग्रेसकडून सेनेला पाठिंबा अशक्य!
By admin | Updated: October 22, 2014 05:41 IST