ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २५ - लोकसभा निवडणुकीमध्ये पानिपत झालेल्या काँग्रेसला लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपदाचाही मान मिळणार नसल्याचे दिसत आहे. अॅटर्नी जनरलनी कायद्याचा आधार घेत संसदेच्या सदस्यसंख्येच्या किमान १० टक्के सदस्य असलेल्या पक्षालाच विरोधी पक्षनेतेपद मिळू शकते असे अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसला लोकसभेमध्ये ४४ जागा मिळाल्या असून किमान ५४ जागा मिळवलेल्या पक्षालाच ही जागा मिळू शकते. विशेष म्हणजे कुठल्याच विरोधी पक्षाला इतक्या जागा मिळालेल्या नाहीत. रोहतगी यांनी यापूर्वीही जवाहरलाल नेहरू व राजीव गांधी यांच्या सत्ताकाळात १० टक्क्यांपेक्षा कमी जागा मिळालेल्या असल्याने विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले नव्हते असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते मनिष तिवारी यांनी अॅटर्नी जनरलचं मत लोकसभेच्या अध्यक्षांना पाळणं बंधनकारक नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे अॅटर्नी जनरलच्या अभिप्रायावर लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याबरोबरच महाजन यांनी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देण्यास नकार दिला तर काँग्रेस न्यायालयात जाते का हा औत्सुक्याचा विषय आहे.