नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध लवकरच एक तीव्र मोहीम सुरू करण्याचे संकेत शनिवारी दिले. नव्या जोमातील काँग्रेस एकटीच भारतीय जनता पार्टी आणि तिच्या वैचारिक मार्गदर्शकास उद्ध्वस्त करण्यास सक्षम असल्याचा दावाही त्यांनी केला.भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १२५ व्या जयंतीपूर्वी आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय संमेलनाचा समारोप राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पार पडला.याप्रसंगी दिलेल्या भाषणात ते म्हणाले, धर्मनिरपेक्षता ही काँग्रेसच्या रक्तातच आहे आणि ती हटविता येणार नाही.हा आमच्या संघटनेचा डीएनए असून आम्हाला त्याचे पुनरुज्जीवन करायचे आहे. मग तुम्ही बघा, काँग्रेस त्यांना केवळ पराभूतच करणार नाही तर संघ आणि भाजपाला उद्ध्वस्त करील. काँग्रेस संघाविरुद्ध लढा देत नसल्याचे मूल्यांकन करणे योग्य नसून आमचा पक्षच त्याविरुद्ध संघर्ष करणारी सर्वांत मोठी शक्ती आहे, असा दावा गांधी यांनी केला.देशातील वाढत्या असहिष्णुतेवर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले, देशाच्या इतिहासात प्रथमच आमच्या राज्यघटनेतील विचार आणि मूल्यांच्या विरोधात असलेल्या फॅसिस्ट संघटनेने केंद्रात निर्णायक शक्ती काबीज केली आहे आणि आम्ही लोकशाही पद्धतीने तिची उचलबांगडी करण्यास सक्षम आहोत.मोदी सरकारने गेल्या १८ महिन्यांत ज्या पद्धतीने काम केले ते बघता हे सरकार आणि संघ या देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी आपल्या शक्तीचा वापर करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच आमच्या उदार, प्रगतशील आणि धर्मनिरपेक्ष सामाजिक मूल्यांवर सातत्याने हल्ले होत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आणि देश विभाजित करणाऱ्या या विचारसरणीविरुद्ध काँग्रेसचा लढा सुरू राहील, असे जाहीर केले.
संघ,भाजपला चिरडण्यास काँग्रेस एकटीच सक्षम
By admin | Updated: November 8, 2015 02:05 IST