सरस्वती वंदनेच्या आदेशावरून गुजरातमध्ये वादंग हिंदुत्वाचा अजेंडा राबविल्याचा काँग्रेसचा आरोप
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
अहमदाबाद- वसंत पंचमीनिमित्त सर्व शाळांनी मुलांकडून सरस्वती वंदना करवून घ्यावी, अशा आशयाची एक नोटीस अहमदाबाद शाळा मंडळाने काढली असून त्यामुळे अहमदाबादेत वादंग निर्माण झाले आहे. भाजपा हिंदुत्वाच्या अजेंड्याला राबवित असल्याचा आरोप करून काँग्रेसने कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
सरस्वती वंदनेच्या आदेशावरून गुजरातमध्ये वादंग हिंदुत्वाचा अजेंडा राबविल्याचा काँग्रेसचा आरोप
अहमदाबाद- वसंत पंचमीनिमित्त सर्व शाळांनी मुलांकडून सरस्वती वंदना करवून घ्यावी, अशा आशयाची एक नोटीस अहमदाबाद शाळा मंडळाने काढली असून त्यामुळे अहमदाबादेत वादंग निर्माण झाले आहे. भाजपा हिंदुत्वाच्या अजेंड्याला राबवित असल्याचा आरोप करून काँग्रेसने कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.मंडळाने १९ जानेवारी काढलेल्या या नोटिसीत, वसंत पंचमीनिमित्त विद्येची देवी सरस्वतीची पूजा आयोजित करण्याची आवश्यकता असून शालेय प्रार्थनेदरम्यान विद्यार्थ्यांकडून सरस्वती वंदना करवून घ्यावी तसेच त्यांना अन्य राज्यांमध्ये वसंत पंचमी कशी साजरी केली जाते याची माहिती द्यावी, असे म्हटले आहे. अहमदाबाद महानगरपालिकेच्या शाळा मंडळाच्या शहरात सुमारे ४५० प्राथमिक शाळा आहेत. ज्यात ६४ शाळा या उर्दू माध्यमाच्या असून त्या मुस्लीमबहुल भागात आहेत. या शाळांमध्ये अल्पसंख्य समाजातील सुमारे १६ हजार विद्यार्थी शकत आहेत. या नव्या सूचनेवर काँग्रेसने हरकत घेतली असून यामुळे मुस्लीमांच्या मूलभूत अधिकारांवर हल्ला होत असल्याचे म्हटले आहे. इस्लाममध्ये कुठल्याही प्रकारची मूर्ती पूजा वर्ज्य आहे. सरखेज वॉर्डाचे काँग्रेसचे नगरसेवक हाजी मिर्जा बेग यांनी हा भाजपाचा हिंदुत्ववादी अजेंड्याला प्रोत्साहन देण्याचा भाग असल्याचे म्हटले आहे. लोकशाहीत प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला त्याच्या धर्मानुसार वागण्याचा अधिकार आहे. ही सूचना फक्त मुस्लीम बांधवांच्या स्वातंत्र्यावरील हल्ला नसून ती दुसऱ्या धर्मांच्या स्वातंत्र्यावरही घाला असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे. ही सूचना उर्दू शाळांमध्ये आवश्यक करू नये. या तानाशाही वर्तनाचा निषेध केला जाईल अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे त्यांनी पुढे स्पष्ट केले आहे.