मतभेद चव्हाट्यावर : यादव, भूषण यांच्यावर कारवाई?नवी दिल्ली : अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर सतर्क झालेल्या आम आदमी पार्टीने ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांच्याविरुद्ध शिस्तभंग कारवाईचे संकेत दिले आहेत़ येत्या बुधवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत या दोन्ही नेत्यांवर शिस्तीचा बडगा उगारला जाऊ शकतो़ मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पक्षाच्या राष्ट्रीय संयोजक पदावरून हटविण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप आहे.आप नेते संजय सिंह यांनी सोमवारी पत्रपरिषदेत याबाबतचे संकेत दिले़ केजरीवाल यांना हटवून यादव यांना पक्ष संयोजक बनवले जावे, अशी मागणी आपचे संरक्षक शांतिभूषण यांनी केली आहे़ पक्षातील काही नेत्यांनी केजरीवाल यांना संयोजक पदावरून हटविण्याचे प्रयत्न आरंभले आहेत़ असे करून ते पक्षाला बदनाम करीत आहेत, असे सिंह म्हणाले़ पक्षातील पत्रोपचार अशा प्रकारे मीडियात सार्वजनिक झाल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली़ ते म्हणाले की, मतभेदाचे काही मुद्दे असू शकतात़ मात्र, यावर जाहीर खल न करता पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा होऊ शकली असती़ येत्या बुधवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे़ यात मतभेदांच्या ताज्या मुद्यावर निर्णय घेतला जाईल़गत आठवड्यात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली होती़ या बैठकीत केजरीवालांनी पक्षाच्या संयोजक पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती़ मात्र, सदस्यांनी यास विरोध केला होता़ केजरीवाल हेच राष्ट्रीय संयोजकपदी राहतील, असा निर्णय बैठकीत झाला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले़(लोकमत न्यूज नेटवर्क)दिल्ली निवडणूक काळात योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल या दोघांना पक्षाच्या संसदीय कामकाज समितीतून हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे़ त्यांनी याबाबत थेट उत्तर देण्याचे टाळले.मी कार्यकारिणीच्या बैठकीतील तारखांची माहिती दिली़ बैठकीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर मी काहीही बोलू इच्छित नाही, असे सिंह म्हणाले़