ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, २३ - स्वस्त दरात चांगले फिचर्स असलेले मोबाईल फोन देऊन चीनमधील झिओमी कंपनीने भारतात दमदार प्रवेश केला असला तरी या चिनी मोबाईल फोनविरोधात भारताच्या हवाई दलाने धोक्याचा इशारा दिला आहे. या मोबाईल फोनमधील महत्त्वपूर्ण माहिती चीनच्या सर्व्हरमध्ये जात असल्याने हवाई दलातील अधिका-यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी चिनी फोन वापरु नये अशी सूचना हवाई दलाने केली आहे.
झिओमी या चिनी मोबाईल कंपनीने यावर्षाच्या सुरुवातीला भारतीय बाजारपेठेत पाऊल ठेवले व अवघ्या काही महिन्यांमध्येच या फोनला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र या फोनमधील महत्त्वपूर्ण डाटा चीनच्या सर्व्हरमध्ये जात असल्याचे हवाई दलाचे म्हणणे आहे. 'एका ख्यातनाम सेक्युरिटी सॉल्यूशन कंपनीने झिओमी रेडमी 1s हा मोबाईल तपासून बघितला. या फोनमध्ये सेव्ह केलेले नाव आणि नंबर तसेच एसएमएस चीनमधील अज्ञात स्थळी लावलेल्या सर्व्हरमध्ये सेव्ह केला जात असल्याचे समोर आले आहे असे हवाई दलाचे म्हणणे आहे. याशिवाय लोकेशन शेरींग सुविधेच्या आधारे संरक्षण, संशोधन आणि सरकारी क्षेत्रातील अधिका-यांवर नजर ठेवणे शक्य आहे असा इशाराही हवाई दलाने दिला आहे.
झिओमी फोनवर अशा स्वरुपाचे आरोप झाल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी हाँगकॉंगमधील एका मोबाईल युजरने झिओमीमधून चीनमध्ये महत्त्वपूर्ण माहिती दिली जाते असा दावा केला होता.