पेडण्यातील बसस्थानकाचे काम युद्धपातळीवर १५ ऑगस्टपर्यंत पूर्णत्वास : नागरिकांतून समाधान
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
कोरगाव : पेडणे बसस्थानकाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पेडण्यात बसस्थानक व्हावे, असे गेली कित्येक वर्षे लोकांची मागणी होती. आता ती पूर्णत्वास येणार असल्याने येथे येणार्या बसेसना हक्काचा थांबा मिळाला आहे.
पेडण्यातील बसस्थानकाचे काम युद्धपातळीवर १५ ऑगस्टपर्यंत पूर्णत्वास : नागरिकांतून समाधान
कोरगाव : पेडणे बसस्थानकाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पेडण्यात बसस्थानक व्हावे, असे गेली कित्येक वर्षे लोकांची मागणी होती. आता ती पूर्णत्वास येणार असल्याने येथे येणार्या बसेसना हक्काचा थांबा मिळाला आहे.या बसस्थानकाद्वारे कित्येक विधानसभा, लोकसभा व नगरपालिका निवडणुकीत अनेक राजकारण्यांनी आपली पोळी भाजून घेतली होती. शेवटी बस स्थानकाचे काम हाती घेतल्याने या भागात समाधानाचे वातावरण पसरले आहे. गेल्या २० वर्षांपूर्वी या बसस्थानकाची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. त्या कामाच्या कोनशिलेवर आपल्या नावाची पाटी आमदार, मंत्री महोदयांनी लावली होती. पण रातोरात नावाची पाटीच गायब झाली. सरकार बदलल्यानंतर निवडणुकीत निवडून आल्यास ४८ दिवसांत बस स्थानकाचे काम सुरू होईल, अशी घोषणाही नगराध्यक्ष वासुदेव देशप्रभू यांनी केली होती. मात्र, सत्तेवर आल्यानंतर बस स्थानकाला ना हरकत दाखला देण्यासाठी त्यांना दोन वर्षे लागली. शेवटी या भागाचे आमदार तथा सभापती राजेंद्र आर्लेकर आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रयत्नाने पेडणे बस स्थानकाचे काम सुरू झाले. सुरुवातीला हे काम धिम्या गतीने सुरू झाले. त्यानंतर नगरसेवक उपेंद्र देशप्रभू व माधव शेणवी देसाई यांनी याविरुद्ध आवाज उठविल्यानंतर कामाला गती मिळाली. सध्या बसस्थानकाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पेडण्यात सावंतवाडी, कोल्हापूर, बेळगाव, वेंगुर्ला, केरी, हरमल, पत्रादेवी, मोरजी भागातून अनेक बसेस येतात. मात्र बसस्थानक नसल्याने त्या बसेस रस्त्याच्या बाजूलाच थांबवाव्या लागत होत्या. बस स्थानकाबरोबरच आरटीओ कार्यालय, अग्निशामक दल, पीडब्ल्यूडी कार्यालयाची पेडण्यात व्यवस्था नाही. या बसस्थानकाचे काम व्यंकटराव इन्फ्रा प्रा. लि. या कंपनीकडे असून ते काम दि. १५ ऑगस्ट २०१५ पर्यंत पूर्ण होणार आहे. कामाची गती पाहता येथील नागरिकांनी त्याविषयी समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर) फोटो : पेडणे बसस्थानकाचे सुरू असलेले काम. (विनोद मेथर) २३०१-एमएपी-०७