बेंगळुरू: केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांचा मुलगा कार्तिक गौडा याच्याविरुद्ध येथील एक कन्नड मॉडेल व अभिनेत्रीने बलात्कार आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे़ कार्तिकचा आपल्याशी विवाह झाला होता, असा दावाही या मॉडेलने केला आहे़ हे प्रकरण कर्नाटकच्या महिला आयोगाकडेही पोहोचले असून आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली आहे़दरम्यान गौडा यांनी आपल्या मुलावरील बलात्काराचा आरोप खोटा ठरवला आहे़ माझ्या मुलाला खोट्या आरोपात गोवण्यात येत आहे़ शेवटी कायदा आपले काम करेल़ मी याप्रकरणी कुठलाही हस्तक्षेप करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे़ काल बुधवारी कार्तिकचा अन्य एका तरुणीशी साखरपुडा पार पडला़ त्याच रात्री कथितरीत्या पीडित मॉडेलने त्याच्याविरुद्ध आर.टी़ पोलीस ठाण्यात बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला़ कार्तिक आणि आपण मे महिन्यापासून एकमेकांना ओळखत असून जूनमध्ये त्याने आपल्याशी विवाह केला़ कार्तिकचा वाहनचालक यावेळी उपस्थित होता, असे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे़ पुराव्यादाखल कार्तिक आणि तिची काही छायाचित्रेही तिने पोलिसांना दिली आहेत़ ही छायाचित्रे बनावट नसून खुद्द कार्तिकच्या मित्रांनी ती काढली आहेत़ त्यानेच ती मला पाठवली, असेही या मॉडेलने म्हटले आहे़कर्नाटक महिला आयोगाने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे़ पीडित मॉडेलची बहीण यासंदर्भात आमच्याकडे तक्रार घेऊन आली होती़ मी याप्रकरणी संबंधित मॉडेल आणि तिच्या कुटुंबाशी बोलणार असून पोलीस विभागालाही लिहिणार आहे, असे आयोगाच्या अध्यक्षा मंजुला मनसा यांनी सांगितले़ (वृत्तसंस्था)
गौडांच्या मुलाविरूद्ध बलात्काराची तक्रार
By admin | Updated: August 29, 2014 02:46 IST