नवी दिल्ली : मित्रांचे शत्रू झालेल्या भाजपा आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे़ रविवारी केंद्रात मंत्रिमंडळ विस्तारावरून निर्माण झालेले मतभेद विकोपाला गेले असून, या तणावानंतर केंद्रातील भाजपा-शिवसेना युतीही तुटण्याची चिन्हे असून, समेट अशक्य असल्याचे चित्र आहे़केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या विस्तारात केवळ एक राज्यमंत्रिपद देऊन केली जाणारी बोळवण शिवसेनेच्या जिव्हारी लागली आणि केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी दिल्लीला गेलेले शिवसेना खासदार अनिल देसाई गेल्या पावलीच माघारी परतले़ त्यातच पूर्वाश्रमीचे शिवसेनावासी असलेले सुरेश प्रभू यांचा शपथविधी सोहळ्याआधी भाजपात प्रवेश, यामुळे शिवसेनेचा आणखी जळफळाट झाला; परिणामी केंद्रीय मंत्रिमंडळात पक्षाचे एकमेव मंत्री असलेले अनंत गीते यांना राजीनामा देण्यास सांगण्याच्या मन:स्थितीत शिवसेना नेतृत्व आहे. भाजपाने शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते़ मात्र नंतर त्यांनी शिवसेनेला राज्यमंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला, असा सेना नेत्यांचा दावा आहे. आम्ही आणखी किती अवमान सहन करायचा, अशी प्रतिक्रिया देसार्इंसोबत दिल्लीला गेलेले सेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी या घडामोडीनंतर दिली़ सुरेश प्रभू यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद देण्याचा आग्रह धरण्याची पंतप्रधान वा अमित शहा यांना गरज नव्हती, असेही खैरे म्हणाले़ त्यांच्याकडे आज सत्ता आहे़ पण सत्ता सदासर्वकाळ टिकणारी नाही, असेही ते म्हणाले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
केंद्रातील युती तुटण्याच्या बेतात
By admin | Updated: November 10, 2014 04:41 IST