भिवंडी : शहरातील बहुतांशी सरकारी कार्यालयात व भिवंडी स्थानक असलेल्या मार्गावरील उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालयात निवडणूक कार्यालये सुरू करण्यात आल्याने या मार्गावरून जाणारे पादचारी, वाहनधारक व एस.टी. प्रवासी वाहतूक कोंडीने हैराण झाले आहेत.भिवंडी पूर्व विधानसभा निवडणूक कार्यालय उपविभागीय कार्यालयात व भिवंडी पश्चिम विधानसभा निवडणूक कार्यालय तहसिल कार्यालयात आहेत. ही दोन्ही कार्यालये शहरांतील मुख्य वहातूकीच्या मार्गावर असल्याने त्या मार्गावरील वाहतूक कोंडी वाढत आहे. या दोन्ही कार्यालयात वाहने उभी करू नये असे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांना पोलीसांनी दिले असल्याने ही वहाने रस्त्यावर उभी केली जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी आपली वहाने रस्त्यावर उभी केल्यास शहर वाहतूक पोलीस टोचण करून नेतात. परंतु राजकीय पुढारी व नगरसेवकांच्या गाड्यांना वहातूक पोलीस हात लावत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये वाहतूक पोलीसांविरूध्द असंतोष पसरलेला आहे. तर या मार्गावर नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे एस.टी.स्थानक ते कल्याणरोड हे पन्नास पावलांचे अंतर पार करण्यास अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागत असल्याने प्रवाश्यांना वेळेत पोहोचणे कठीण होऊन बसले आहे. (प्रतिनीधी)
मुख्य मार्गावरील निवडणूक कार्यालयाने नागरिक हैराण
By admin | Updated: September 23, 2014 00:27 IST