शहरवासी शिंकांनी बेजार
By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST
शहरवासी शिंकांनी बेजार
शहरवासी शिंकांनी बेजार
शहरवासी शिंकांनी बेजार-शासकीयसह खासगी रुग्णालयात : ३० ते ४० टक्के सर्दीचे रुग्ण नागपूर : बहुसंख्य शहरवासी शिंका, सर्दीने बेजार झाले आहेत. सर्दी हा तसा साधा आजार असला तरी दहांमधून दोघांना हा आजार दिसून येतो. नाक बंद होणे, शिंका येणे, नाकातून पाणी वाहणे, डोके दुखणे, ताप येणे, घसा दुखणे अशाही तक्रारीच्या रुग्णांची टक्केवारी शासकीय रुग्णालयासोबतच खासगी रुग्णालयात ३० ते ४० टक्के आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) ईएनटी विभागाचे विभागप्रमुख डॉ. अपूर्व पावडे यांनी सांगितले, गारठा वाढताच सर्दीचा त्रास वाढतो. नाकात धूळ गेली, तीव्र वास आला की व्यक्तीला एखाद दुसरी शिंक येते, नंतर थोडा वेळ नाकातून पाणी आल्यासारखेही वाटते, नाकात खाज सुटते किंवा कधी नाक बंद होते. नाकात जे काही गेले आहे, त्याला मिळणारा हा सर्वसाधारण प्रतिसाद असतो. हा प्रतिसाद वाढीव स्वरूपात दिसू लागला तर त्याचे रूपांतर ॲलर्जिक सर्दीत होते. सद्यस्थितीत वातावरणातील बदलांमुळे सर्दीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. गरम हवेतून गार हवेत जाण्यामुळे किंवा अगदी सकाळी उठल्यानंतर वातावरणात जो बदल जाणवतो त्यामुळेही काही व्यक्तींना सर्दी होते. सर्दीचा दुसरा प्रकार म्हणजे जंतूसंसर्गामुळे होणारी सर्दी. यातही वेगवेगळ्या विषाणूंमुळे होणारी सर्दी (कॉमन कोल्ड) आणि जीवाणू संसर्गामुळे होणारी सर्दी, असे दोन प्रकार आढळतात. एकदा विषाणूसंसर्गामुळे सर्दी झाल्यानंतर शरीरात त्या विषाणूविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती तयार होत असते. पण दर एक किंवा दोन महिन्यांनी विषाणू आपले आवरण बदलत असल्यामुळे एक-दोन महिन्यांनी पुन्हा सर्दी होण्याची शक्यता उद्भवते. ऱ्हायनोव्हायरस, एन्फ्लुएन्झा व्हायरस, ऑडिनोव्हायरस अशा विविध विषाणंूमुळे ही सर्दी होते. वेगवेगळ्या प्रकारच्या सर्दीवर वेगवेगळे उपचार आहेत. प्रत्येक रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधोपचार करणे आवश्यक आहे.