सीआयडी अधिकारी असल्याचे सांगून लूट
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
- डीसीपी दीपाली मासिरकर यांनी पकडले रंगेहाथ
सीआयडी अधिकारी असल्याचे सांगून लूट
- डीसीपी दीपाली मासिरकर यांनी पकडले रंगेहाथनागपूर : सीआयडी अधिकारी असल्याचे सांगून मजुरांना लुटणाऱ्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या डीसीपी दीपाली मासिरकर यांनी सतर्कतेने पकडले. या गुन्हेगाराला रंगेहाथ पकडण्यात बुधवारी रात्री पोलिसांना यश आले आहे. गुन्हेगार कामठी निवासी २५ वर्षीय असून त्याचे नाव शाहिद गुलाम अली आहे. शाहिदचे सगळेच मित्र गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्याचे वडील आणि भाऊ यांच्यावरही गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. शाहिदच्या विरोधातही लुटमार आणि गंभीर गुन्हे पोलिसांकडे नोंदविण्यात आले आहेत. बुधवारी रात्री १२.४५ वाजता बालाघाट येथील निवासी राजेंद्र जरीमा मजुरीवरून हंसापुरी येथे जात होते. मेयो हॉस्पिटल चौकात दुचाकीस्वार शाहिदने राजेंद्र यांना थांबविले. स्वत: सीआयडी अधिकारी असल्याची बतावणी करीत राजेंद्र यांना रात्री उशिरापर्यंत फिरण्याबद्दल तो धाक दाखवायला लागला. सीआयडी अधिकारी असल्याची बतावणी केल्याने राजेंद्र घाबरले. याचाच लाभ घेत शाहिदने मजुराची तपासणी घ्यायला लागला. त्यावेळी गुन्हे शाखेच्या डीसीपी दीपाली मासिरकर तेथून जात होत्या. मजुराची तपासणी करणाऱ्या शाहिदला पाहून त्यांना शंका आली. त्यांनी वाहन थांबवून त्या शाहिद आणि राजेंद्र यांच्याकडे गेल्या. शाहिद सामान्य कार असल्याचे समजून शांतपणे उभा होता. याप्रसंगी मासिरकर यांनी चौकशी केली असता राजेंद्र यांनी घडलेली घटना सांगितली. मासिरकर यांनी विचारपूस केली असता शाहिद समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. यानंतर मासिरकर यांच्या आदेशावरून पोलीस कर्मचाऱ्यांनी शाहिदला ताब्यात घेतले. शाहिद कळमना परिसरात राहतो. अनेक दिवसांपासून तो पोलीस असल्याचे सांगत लुटमार करीत आहे. यासंदर्भात तहसील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.