नवी दिल्ली : उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ चीनच्या दौ:यावर असतानाच अरुणाचल प्रदेश व जम्मू-काश्मीरच्या काही भागांवर दावा सांगणारी कुरापत काढणा:या चीनने लडाखच्या उंच भागातील पंगोंग सरोवरात शुक्रवारी घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. त्यातून राजनैतिक तणाव वाढला आहे.
वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकी वृत्तपत्रने चीनने बदललेला नकाशा प्रसिद्ध केल्यानंतर भारताने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्रलयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन म्हणाले, अशा प्रकारे नकाशा बदलून सत्य परिस्थिती बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य घटक आहे, हे चीनला आम्ही वेळोवेळी बजावून सांगितले आहे. मोदी सरकार आल्यानंतर चीनने प्रथमच अशा प्रकारची कुरापत काढली आहे. चीन भारतासोबत नवीन युद्धाच्या तयारीत आहे, हाच वॉशिंग्टन पोस्टने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचा गोषवारा आहे. बातमीत दक्षिण-चीन समुद्र तसेच चीनचा जपानशी सुरू असलेला वाद यांचाही उल्लेख आहे. या पाश्र्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी भूमार्गे घुसखोरी केल्यानंतर आता चिनी सैनिकांनी हायस्पीड बोटी वापरून लडाखमधील पंगोंग पट्टय़ात घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. चीनचे सैनिक तब्बल दोन तास भारतीय हद्दीत थांबून निघून गेले. या आधी 12 वेळा चिनी आणि भारतीय जवान पंगोंग खो:यात समोरासमोर उभे ठाकले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)