सरावादरम्यान चिमुकला गंभीर जखमी
By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST
उपचाराला विलंब : शाळा व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल
सरावादरम्यान चिमुकला गंभीर जखमी
उपचाराला विलंब : शाळा व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल नागपूर : नृत्याचा सराव करताना गंभीर जखमी झालेल्या मुलाला तातडीने वैद्यकीय मदत देण्याऐवजी स्कूल प्रशासनाने वेळकाढू धोरण अवलंबल्याचा आरोप करून संतप्त पालकांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यामुळे वाडी पोलिसांनी कॉर्मल अकॅडेमी स्कूल व्यवस्थापनातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.हनुमाननगर वडधामना (वाडी) येथील छाया तेजराव गौतरे (वय ३२) यांचा मुलगा सार्थक (वय ९ वर्षे) हा वाडीतील कॉर्मल अकॅडेमी स्कूलमध्ये तिसऱ्या वर्गात शिकतो. वार्षिक स्नेहसंमेलनाची शाळेत तयारी सुरू आहे. बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास नृत्याचा सराव करताना सार्थकच्या पायावर बेंच पडला. त्यामुळे त्याच्या डाव्या पायाची करंगळी तुटली अन् सार्थक गंभीर जखमी झाला. शाळा व्यवस्थापनाने त्याला तातडीने औषधोपचाराची व्यवस्था केली नाही, असा आरोप करून सार्थकची आई छाया गौतरे यांनी वाडी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी हलगर्जीपणाच्या आरोपाखाली फादर जेनिस मातिव्ह काताकोटिल, सपना चौबे तसेच अमित केअरकटा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.-----