नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या शाही मेजवानीचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र सदनचे माजी निवासी आयुक्त बिपिन मल्लिक यांच्या विसरभोळेपणामुळे मिळाले नसल्याची माहिती पुढे आली आहे. तथापि, या प्रकरणी सदनाच्या संपर्काधिकारी संध्या पवार यांना लेखी विचारणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारमधून केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या मल्लिक यांना कोण विचारणा करणार, असा पेच उभा ठाकला आहे. २५ जानेवारी रोजी ओबामा यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात मेजवानी आयोजित करण्यात आली होती. तिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर या दोघांनाच निमंत्रित कण्यात आले होते. राष्ट्रपती भवनातून या मेजवानीचे निमंत्रण १७ जानेवारीला तत्कालीन निवासी आयुक्त बिपीन मल्लिक यांना मिळाले. त्यांनी ते सहायक आयुक्त तथा संपर्काधिकारी संध्या पवार यांना दिले. कार्यालयीन पध्दतीनुसार पवार यांनी ते निमंत्रण मुख्यमंत्री कार्यालयास फॅक्सव्दारे पाठवून स्पीडपोस्टने मूळप्रत पाठविली. ती २३ तारखेला मुख्यमंत्री कार्यालयाला मिळाली. मुख्यमंत्र्यांची खास निमंत्रणे या पध्दतीने पाठविल्यानंतर लागलीच निवासी आयुक्त स्वत: मुख्यमंत्री कार्यालयास संपर्क करून खातरजमा करून घेत असतात. हीच पध्दत गेली अनेक वर्षे आहे. यावेळी मात्र माजी निवासी आयुक्त बिपीन मल्लीक संपर्क साधण्यास विसरल्याने हा गोंधळ झाल्याची माहिती आहे. त्यामुळे दाव्होसला गेलेल्या मुख्यमंत्र्यांना ही माहिती मिळू शकली नाही.निवासी आयुक्त आभा शुक्ला यांनी ‘लोकमत’ला सांगितले, २० जानेवारीला आपण रूजू होण्याआधीच आलेल्या त्या निमंत्रणाचा दिल्ली ते मंत्रालय असा कार्यालयीन प्रवास लेखी स्वरूपात मागितला आहे. (विशेष प्रतिनिधी)