आज होणार शपथविधी : अण्णा द्रमुकच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी जयललिता यांची निवडचेन्नई : ‘कमबॅक क्वीन’ किंवा ‘कमबॅक सीएम’ अशी ओळख लाभलेल्या अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा ६७ वर्षीय जयललिता पाचव्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनणार आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाने त्यांचा मार्ग प्रशस्त बनला होता. शुक्रवारी आमदारांच्या बैठकीत औपचारिकरीत्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवडीची घोषणा होताच त्यावर शिक्कामोर्तब झाले. मद्रास विद्यापीठाच्या शताब्दी सभागृहात त्या शनिवारी ११ वाजता शपथ घेणार असल्याचे पक्षसूत्रांनी स्पष्ट केलेआहे.शुक्रवारी सकाळी पार्टी प्रेसिडियमचे चेअरमन ई. मधुसूदनम यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदी जयललिता यांची एकमताने निवड करण्यात आली. कर्नाटक उच्च न्यायालयाने बेहिशेबी संपत्तीप्रकरणी ११ मे रोजी जयललितांना निर्दोष ठरविले होते. पक्षाचे कोषाध्यक्ष पनीरसेल्वम यांनी जयललिता यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला वीजमंत्री नाथम आर. विश्वनाथन यांनी अनुमोदन दिले. जयललिता यांच्या नावाची घोषणा होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या आमदारांनी टाळ्यांचा कडकडाट करीत स्वागत केले. त्यानंतर राज्यभरात कार्यकर्त्यांनी जणू उत्सव साजरा केला. तामिळनाडूच्या विविध भागांत कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, मिठाई वाटत तर कुठे ढोल-ताशांच्या धडाक्यात नृत्य करीत जल्लोष केला. जयललिता यांना दोषी ठरविण्यात आल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे गेल्यावर्षी २९ सप्टेंबर रोजी पनीरसेल्वम यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली होती. २००१ मध्ये तान्सी घोटाळ्यात जयललितांना दोषी ठरविल्यानंतरही पनीरसेल्वम हेच मुख्यमंत्री बनले होते. त्यावेळी ते सहा महिने या पदावर होते.डीएमडीकेच्या सात बंडखोर आमदारांनी अण्णाद्रमुक विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून सहभागी होत समर्थन जाहीर केले. या आमदारांना २०१३ मध्ये विजयकांत यांनी पक्षनेतृत्वाचा अपमान केल्याबद्दल निलंबित केले होते. (वृत्तसंस्था)४मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर आठ महिन्यांनी जयललिता यांनी शुक्रवारी प्रथमच सार्वजनिक दर्शन घडविल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. त्या राजभवनाकडे जात असताना हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनावर फुलांचा वर्षाव केला. ४जयललिता यांचे पोस गार्डन निवासस्थान ते राजभवन या चार कि.मी.च्या मार्गावर कार्यकर्त्यांनी ‘चेंडा मेलम’ आणि अन्य वाद्ये वाजवत मिरवणूक काढली. मार्गातच त्यांनी गणपती मंदिरात दर्शन घेतले. नक्षीकाम केलेली हिरवी साडी परिधान केलेल्या जयललितांना अभिवादन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केल्याने पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. ४जयललिता यांनी राज्यपाल के. रोसय्या यांची भेट घेऊन मंत्र्यांची यादी सादर केली. तत्पूर्वी, राज्यपालांनी त्यांना मंत्रिमंडळ स्थापण्यासाठी निमंत्रित केले होते. मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांचा आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याचे राजभवनाने एक निवेदनात नमूद केले.
अम्मा बनणार पाचव्यांदा मुख्यमंत्री
By admin | Updated: May 23, 2015 00:14 IST