सिंचन घोटाळ्यातील सर्वच प्रकल्पांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री : एकही फाईल प्रलंबित नाही
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
नागपूर : सिंचन घोटाळ्यातील विदर्भ, कोकणसह राज्यातील इतरही सिंचन प्रकल्पांच्या चौकशीचे आदेश यापूर्वीच एसीबीला(लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)देण्यात आले आहेत,या संदर्भातील एकही फाईल राज्य शासनाकडे प्रलंबित नाही,असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सिंचन घोटाळ्यातील सर्वच प्रकल्पांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री : एकही फाईल प्रलंबित नाही
नागपूर : सिंचन घोटाळ्यातील विदर्भ, कोकणसह राज्यातील इतरही सिंचन प्रकल्पांच्या चौकशीचे आदेश यापूर्वीच एसीबीला(लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)देण्यात आले आहेत,या संदर्भातील एकही फाईल राज्य शासनाकडे प्रलंबित नाही,असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.रविवारी येथील धरमपेठ वाणिज्य महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सिंचन घोटाळ्याची चौकशी करताना फक्त कोकणातीलच प्रकल्पांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीतून विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या प्रकल्पांना वगळले, अशी चर्चा आहे. याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ही चर्चा निराधार आहे. सिंचन घोटाळ्याशी संबंधित एसीबीने आतापर्यंत ज्या ज्या परवानग्या शासनाकडे मागितल्या आहेत त्या सर्व प्रकरणांच्या चौकशींचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्यात कोकणासह विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या प्रकल्पांसह राज्यातील सर्व प्रकल्पांचा समावेश आहे. या संदर्भातील एकही फाईल आमच्याकडे प्रलंबित नाही. क्रिकेट सामन्यात भारत विजयी झाल्यानंतर मुंबईत रात्री जल्लोष साजरा करण्यासाठी अद्याप परवानगी मागण्यात आली नाही. तशी मागणी झाल्यास परवानगी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्वाईन फ्लूराज्यात स्वाईन फ्लूची साथ वाढत असल्याने पर्यटनावर परिणाम होणार का, असा सवाल फडणवीस यांना केला असता ते म्हणाले, सध्या राज्यात स्वाईन फ्लूची स्थिती नियंत्रणात आहे. यावर सावधगिरी बाळगणे आवश्यक असून, राज्य सरकारने त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. स्वाईन फ्लूचा फैलाव वाढत असल्याने राज्यातील पर्यटनावर परिणाम होणार नाही, कारण शासन याबाबत दक्ष आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे फडणवीस म्हणाले. (प्रतिनिधी)