नवी दिल्ली : जुन्याच योजनांना नवा साज चढवत देण्यात आलेले १.२५ लाख कोटी रुपयांचे पॅकेज हा निवडणूक जुमला असल्याचा आरोप होत असतानाच केंद्र सरकारने त्यासाठी अतिरिक्त तरतूद करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या पॅकेजअंतर्गत प्रत्येक योजना नवी राहणार आहे. सुरू न झालेली कामे हाती घेण्यासाठी निधीचा वापर केला जाईल. केंद्राकडून सर्वसाधारण मदतीचा ओघ सुरूच राहणार असून त्याशिवाय दिला गेलेला हा वेगळी निधी असेल, असा खुलासाही केला आहे. बिहारच्या पॅकेजवरून नितीशकुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संयुक्तरीत्या हल्ला चढविल्यानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर यांनी मदत पॅकेजचे राजकारण केले जाऊ नये, असा इशारा दिला.मोदींनी बिहारसाठी पॅकेजची घोषणा केली असली तरी त्यासाठी कोणतीही अर्थसंकल्पीय तरतूद केली नसून हा पैसा कुठून दिला जाणार तेसुद्धा स्पष्ट करण्यात आलेले नाही, या विसंगतीकडे विरोधकांनी लक्ष वेधले असता उच्चपदस्थ सूत्रांनी येत्या काही वर्षात पॅकेजअंतर्गत समाविष्ट योजनांना अर्थसंकल्पात स्थान दिले जाणार असल्याचे नमूद केले. एवढे मोठे पॅकेज देण्यात आल्यामुळे तुटीचा बोजा वाढणार असल्याची भीतीही सूत्रांनी निरर्थक ठरवली आहे. प्रस्तावित खर्च हा भांडवली खर्चाचा भाग असेल. त्यामुळे उत्पादकता वाढीस लागून बदल्यात उच्च विकास दर लाभेल. नव्या योजना सुरू करण्यांसह अद्याप सुरू न करण्यात आलेली कामे संपविण्यासाठी हा निधी उपयोगात आणला जाईल, असेही सूत्रांनी म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
बिहार पॅकेजवरून आरोप-प्रत्यारोप
By admin | Updated: August 21, 2015 00:11 IST