जयपूर: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह स्वातंत्र्य संग्रामातील काही नेत्यांची माहिती पाठ्यपुस्तकातून हटविण्याचा निर्णय घेणाऱ्या राजस्थान सरकारने, आता शालेय अभ्यासक्रमातील माहितीचा अधिकार कायद्याशी (आरटीआय) संबंधित धडाही काढून टाकला आहे.इयत्ता आठवीच्या समाजविज्ञानाच्या पुस्तकात बाराव्या धड्यात पृष्ठ क्रमांक १०५ वर आरटीआय आणि लोकांना असलेला त्याचा फायदा, यावर आधारित माहिती देण्यात आली होती, पण सरकारने ती काढून टाकली आहे. शेतमजूर संघटनेच्या नेत्या अरुणा राय आणि निखिल डे यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला असून, पाठ्यपुस्तकात बदल न करण्याचे आवाहन केले आहे. अरुणा राय म्हणाल्या की, ‘देशात आणि साऱ्या जगात माहिती अधिकार कायद्याची लोकप्रियता वाढते आहे. सरकारतर्फे माहितीच्या अधिकारासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. अशात राज्य सरकारने असा निर्णय घेणे राजस्थानसाठी आत्मघाती ठरेल.’ काँग्रेसने राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करताना मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना पारदर्शिकतेशी काही देणेघेणे नाही, हे यावरून स्पष्ट होत असल्याची टीका केली आहे. भाजपाने काँग्रेस व एमकेएसएसच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना एखादा धडा पाठ्यक्रमातून काढून टाकण्यात आला असल्यास पुढील सत्रात तो पुन्हा समाविष्ट केला जाईल, अशी ग्वाही दिली. (वृत्तसंस्था)
पुस्तकातून काढला ‘आरटीआय’चा धडा
By admin | Updated: May 19, 2016 04:31 IST