ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, २२ - सोशल मिडीयावर नेट न्यूट्रेलिटीच्या समर्थनार्थ मोहीम सुरु असतानाच केंद्र सरकार उद्योजकांना नेट विकत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी लोकसभेत केला आहे. नेट न्यूट्रेलिटीसाठी केंद्र सरकारने विद्यमान कायद्यात बदल करावा किंवा नवीन कायदाच आणावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सध्या सोशल मिडीयावर नेट न्यूट्रेलिटीचा मुद्दा चांगलाच गाजत असून तीन लाखहून अधिक नेटिझन्सनी ट्रायला ईमेल पाठवून नेट न्यूट्रेलिटी अबाधित ठेवण्याची विनंती केली आहे. बुधवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नेट न्यूट्रेलिटीचा मुद्दा लोकसभेत मांडला. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी एका वृत्तपत्रातील लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. यासाठी मोदींचे कौतुक केले पाहिजे असा टोला लगावत राहुल म्हणाले, सोशल मिडीयावर नेट न्यूट्रेलिटीसाठी मोहीम सुरु आहे. पण सरकार नेट उद्योजकांना हाततात देण्याचा प्रयत्न करत आहे.
राहुल गांधींनी हा मुद्दा मांडल्यावर माहिती व सुचना प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजीटल इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयापर्यंत इंटरनेट पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आमचे उद्योजकांच्या दबावाखाली काम करत नसून ट्रायने शिफारस केली तरी अंतिम निर्णय आम्हीच घेणार आहोत असे त्यांनी लोकसभेत स्पष्ट केले.