नवी दिल्ली : सरकारने २८१ कोटी रुपयांच्या थेट विदेशी गुंतवणुकीच्या (एफडीआय) २१ प्रस्तावांना मंजुरी दिली; परंतु महिंद्र बँकेत विदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवून ५५ टक्के करण्याचा प्रस्ताव नाकारला आहे.अर्थ मंत्रालयाने सोमवारी ही माहिती निवेदनाद्वारे दिली. त्यात म्हटले आहे की,‘‘सरकारने २८०.७० कोटी रुपयांच्या थेट विदेशी गुंतवणुकीच्या २१ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. ज्या प्रस्तावांना मंजुरी आवश्यक आहे त्यांना विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ मंजुरी देते. ज्या प्रस्तावांमध्ये गुंतवणूक ३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असते त्यांना मंत्रिमंडळाची आर्थिक समिती मंजुरी देते. ’’ एफआयपीबीने ३० एप्रिलच्या आपल्या बैठकीत औषध कंपनी लॉ रेनॉन हेल्थकेअरच्या १०० कोटी रुपयांच्या नव्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.आर्थिक प्रकरणांच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालील आंतर मंत्रालयीन समितीने ब्ल्यू डार्ट एक्स्प्रेसच्या ब्ल्यू डार्ट एव्हिएशन लिमिटेडमध्ये शेअर अधिग्रहण आणि भागीदारी ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ही गुंतवणूक ५२.८ कोटी रुपयांवरून ६९ कोटी रुपये होणार आहे. या मंडळाने एफडीआयचे महिंद्रसह १२ प्रस्ताव नाकारले आहेत.(लोकमत न्यूज नेटवर्क)
२८१ कोटींच्या एफडीआय प्रस्तावांना केंद्राची मंजुरी
By admin | Updated: May 26, 2015 00:10 IST