नवी दिल्ली : राज्यातील मराठवाडा व विदर्भातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक शुक्रवारपासून राज्याचा दौरा करणार आहे.राज्य सरकारने केंद्राकडे ३९२४ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव दोन दिवसांपूर्वी सादर केल्याने केंद्राने पाहणी पथक तयार केले आहे. त्यांच्या अहवालानंतर मदतीचे पॅकेज केंद्र सरकार जाहीर करणार आहे.वित्तमंत्री अरूण जेटली व कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या भेटीनंतर सिंह यांनी राज्यात पथक पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. पत्रकारांना त्यांनी सांगितले, की दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी राज्य हादरले असून, त्या होऊ नयेत म्हणून प्रामुख्याने कर्ज वसुलीला स्थगिती, शेतकऱ्यांने वीजबिल भरले नसले तरी त्यांची वीज कापू नये, कर्जाचे पुनर्गठण करण्यात येत आहे, अशा काही उपाययोजना केल्या आहेत. राज्याच्या अहवालावरून कृषिमंत्री त्यांना व राज्य सरकारला सूचना देणार आहेत. दरम्यान, केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची खडसे यांनी भेट घेऊन जळगाव जिल्ह्यातील संरक्षण मंत्रालयाच्या कारखान्यांमध्ये स्थानिक युवकांना ४० टक्के नोक-या मिळाव्यात अशी मागणी केली. संरक्षण मंत्री फेब्रुवारी २०१४ मध्ये वरणगांव आणि भुसावळ येथे भेट देतील, असे खडसे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
दुष्काळी भागात केंद्राचे पाहणी पथक
By admin | Updated: December 5, 2014 03:43 IST