मद्रास हायकोर्टाचा आदेशचेन्नई : महाविद्यालय, विद्यापीठ आणि अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये सौंदर्यस्पर्धा आयोजित करण्यावर बंदी घालण्याबद्दल परिपत्रक जारी करा, असा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला दिला आहे. त्यामुळे कॉलेज क्वीनसारख्या सौंदर्यस्पर्धांवर बंदीचा पडदा पडला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रॅम्पवर कसे चालावे हे शिकल्याने काय फायदा होणार हे कळत नाही, असा सवाल न्या. टी.एस. सिवाग्ननाम यांनी अंतरिम आदेशात केला. विशेष म्हणजे ही याचिका सौंदर्यस्पर्धांवर बंदी घालण्यासाठी नव्हे, तर अशाच एका स्पर्धेच्या निकालात आपल्या मुलीवर अन्याय झाल्याबद्दल दाद मागण्यास लक्ष्मी सुरेश यांनी केली. सौंदर्यस्पर्धा आयोजित करू नये किंवा सौंदर्याच्या आधारावर सर्वोत्कृष्ट महाविद्यालयीन युवक/ युवतींची निवड करणाऱ्या स्पर्धा भरविल्या जाऊ नयेत. आंतर महाविद्यालय स्तरांवरही अशा स्पर्धा किंवा कार्यक्रम आयोजित केले जाऊ नयेत, यासाठी उच्च शिक्षण सचिव, तांत्रिक शिक्षण आयुक्तांनी सर्व संस्था, विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ व विविध विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांना आदेश द्यावा, असेही न्यायाधीशांनी स्पष्ट केले.
शिक्षण संस्थांतील सौंदर्यस्पर्धांवर बंदी
By admin | Updated: February 7, 2015 02:54 IST