भाजपा नगरसेवकांची निवडणूक रद्द करा
By admin | Updated: March 23, 2017 17:18 IST
दिवाणी न्यायालयात दावा : दुसऱ्याच्या यशाचे श्रेय लाटल्याचा आरोप
भाजपा नगरसेवकांची निवडणूक रद्द करा
दिवाणी न्यायालयात दावा : दुसऱ्याच्या यशाचे श्रेय लाटल्याचा आरोपनागपूर : नागपूर सुधार प्रन्यास गुंडाळण्याच्या निर्णयाचे श्रेय स्वत:कडे घेऊन त्याचा निवडणुकीत प्रचार केल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सर्व विजयी नगरसेवकांची निवडणूक रद्द करण्यात यावी, अशा विनंतीसह वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. अनिल मिश्रा असे दावा दाखल करणाऱ्याचे नाव असून, ते खासगी नोकर आहेत.मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, शासनाने त्यांच्या प्रयत्नामुळे नासुप्र गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपाला त्यांच्या परवानगीशिवाय या निर्णयाचे श्रेय स्वत:कडे घेऊन त्याचा निवडणुकीत प्रचार करण्याचा अधिकार नाही. त्यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज दाखल करून नासुप्रमधील गैरव्यवहाराची माहिती मिळविली. त्या आधारावर शासनाला निवेदन सादर करून नासुप्र गुंडाळण्याची मागणी केली होती. शासनाने त्याची दखल घेऊन नासुप्र गुंडाळण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा कोणत्याही राजकीय पक्षाने मनपा निवडणुकीत गैरवापर करू नये, यासाठी मिश्रा यांनी ३१ जानेवारी २०१७ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना व २ फेब्रुवारी २०१७ रोजी राज्य निवडणूक आयोगाला निवेदन सादर केले होते. असे असताना जिल्हाधिकारी व राज्य निवडणूक आयोगाने मनपा निवडणुकीत नासुप्र गुंडाळण्याच्या निर्णयाचा गैरवापर टाळण्यासाठी योग्य काळजी घेतली नाही. भाजपाने जाहीरनामा व प्रचार पत्रकांमध्ये या निर्णयाचे श्रेय स्वत:कडे घेतले. त्या बळावर मनपाची सत्ता मिळविली, असे दाव्यात नमूद करण्यात आले आहे. -----------------प्रतिवादींना नोटीसन्यायालयाने दाव्यावर सुनावणी केल्यानंतर जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व राज्य निवडणूक आयोग यांना नोटीस बजावून २५ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयात मिश्रा यांनी स्वत:च युक्तिवाद केला.