ऑनलाइन टीम
शिलाँग, दि. ४ - देशभरात महिलांवरील अत्याचारांचे सत्र सुरूच असून मेघालयमधील एका गावात बलात्कारास विरोध करणा-या महिलेच्या डोक्यात गोळी घालून तुकडे करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मेघालयातील दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यातील राजा रोंगत गावामध्ये ही घटना घडली असून गारो नॅशनल लिबरेशन आर्मी या अतिरेकी संघटनेच्या (जीएनएलए) संशयित अतिरेक्यांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर दुर्दैवी महिला पती व मुलांसह घरात असताना गारो नॅशनल लिबरेशन आर्मी अतिरेकी संघटनेचे चार ते पाच अतिरेकी मंगळवारी संध्याकाळी तिच्या घरात घुसले. त्यांनी त्या महिलेचा पती व मुलांना घरात कोंडले व त्या महिलेस घराबाहेर ओढले. त्यांनी तिच्यावर प्रथम हल्ला करत नंतर तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर महिलेने त्यांना विरोद केला असता त्या अतिरेक्यांनी स्वयंचलित रायफलने तिच्या डोक्यात गोळी झाडली. ज्यामुळे तिच्या डोक्याचे दोन तुकडे झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
गारो हिल्स भागाचे प्रतिनिधीत्व करणा-या खासदार पी ए संगमा यांनी या कृत्याचा निषेध केला असून, दिवसेंदिवस या भागातील कायदा-सुव्यवस्था बिघडत चालल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य सरकारा अशा प्रकारच्या समस्यांवर मार्ग शोधण्यात अपयशी ठरल्याचेही ते म्हणाले.