नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित गोपनीय फाईल्स सार्वजनिक कराव्यात की नाही, यावर विचार करण्यासाठी ब्रिटनने आणखी मुदत मागितली आहे. नेताजींचे पुतणे सूर्यकुमार बोस यांनी रविवारी एका वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, माझी बहीण माधुरी बोस हिने ब्रिटिश सरकारशी संपर्क साधून नेताजींशी संबंधित सर्व फाईल्स सार्वजनिक करण्याची विनंती केली होती. यावर आमच्याकडे नेताजींसंदर्भात काही गोपनीय दस्तऐवज असल्याचे ब्रिटनने मान्य केले; मात्र ते उघड करण्याचा निर्णय घेण्यासाठी आणखी वेळ लागेल, असे स्पष्ट केले होते. अलीकडे नेताजींसंदर्भातील ६० पेक्षा अधिक फाईल्स सार्वजनिक करणाऱ्या पश्चिम बंगाल सरकारची सूर्यकुमार बोस यांनी तोंडभरून स्तुती केली. ममता बॅनर्जी सरकारचा निर्णय अतिशय स्तुत्य आहे. आता केंद्रानेही आपल्याकडील फाईल सार्वजनिक करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
फाईल्सबाबत ब्रिटनला हवी आणखी मुदत
By admin | Updated: October 4, 2015 23:35 IST