नवी दिल्ली : सरकारी नोकरीसाठी निवड होऊनही प्रशिक्षणाठी निवड करणाऱ्या समितीची बैठकच रखडल्यामुळे काही युवक वर्षाहून अधिक काळ नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका फोनने मेटाकुटीस आलेल्या या युवकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला.कृषी संशोधक भरती मंडळाच्या शिफारशीनंतर केंद्राच्या कृषी अनुसंधान परिषदेने ‘कृषी वैज्ञानिक’ या पदासाठी देशभरातील अनेक विद्यार्थ्यांची निवड केली. यानंतर या उमेदवारांना हैदराबादच्या राष्ट्रीय कृषी मनुष्यबळ व्यवस्थापन अकादमीत प्रशिक्षण व नंतर पोस्टिंग दिली जाते. जानेवारी व जून या दोन टप्प्यांत प्रशिक्षण होते. या वेळी जरा वेगळेच चित्र पाहायला मिळाले. निवड झालेल्या उमेदवारांना दिल्लीत बोलविण्यात आले, पण प्रशिक्षण समितीची बैठकच होत नव्हती.आठ - १० दिवसांपासून हे उमेदवार बड्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत होते, पण ठोस निर्णय होत नव्हता. प्रशिक्षण समितीची बैठक रखडल्याने २०० उमेदवारांचे प्रशिक्षण मात्र विलंबाने होणार होते. यापैकी महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेशातील काही युवक नितीन गडकरी यांना भेटायला त्यांच्या बंगल्यावर आले. त्यांनी या युवकांचे म्हणणे ऐकले आणि एक फोन लावला अन् १२ तासांत या युवकांसह देशातील २०० जणांची तुकडी हैदराबादला प्रशिक्षणासाठी रवाना होईल, असा आदेश कृषी मंत्रालयातून जारी झाला़प्रशिक्षणाचा आदेश जारी होताच ते सारे युवक गडकरींना भेटले, तेव्हा त्यांच्याजवळ शब्दच नव्हते. त्यांनी पुष्पगुच्छ दिला तेव्हा गडकरी म्हणाले, ‘तुम्ही कृषी संशोेधक आहात. देशाच्या मातीला बहरून टाका!’ गडकरींनी फोन कोणाला केला होता, ते गुलदस्त्यातच आहे. (विशेष प्रतिनिधी)
शेती फुलवणाऱ्यांच्या चेह-यावर आनंद फुलला !
By admin | Updated: December 8, 2014 02:18 IST