आयुर्वेद महाविद्यालयासमोरील खूनप्रकरण
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
दोन्ही भावांचा जामीन अर्ज फेटाळला
आयुर्वेद महाविद्यालयासमोरील खूनप्रकरण
दोन्ही भावांचा जामीन अर्ज फेटाळलाआयुर्वेद महाविद्यालयासमोरील खूनप्रकरणनागपूर : सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयुर्वेद महाविद्यालयासमोर झालेल्या सतपालसिंग धुन्ना याच्या खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.एस. मुरकुटे यांच्या न्यायालयाने दोन आरोपी बंधूंचा जामीन अर्ज फेटाळून लावला. प्रदीप मोहनलाल ठाकूर आणि सुहास मोहनलाल ठाकूर रा. सहकारनगर खरबी रोड, अशी आरोपींची नावे आहेत. खुनाची ही घटना २० ऑक्टोबर २०१४ रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली होती. प्रकरण असे की, छापरूनगर जीवनदीप सोसायटी येथे राहणारा मृताचा भाऊ अवतारसिंग याने घटनेच्या आठ महिन्यापूर्वी सादिक अन्सारी याला दोन लाख रुपये उसणे दिले होते. काही दिवसानंतर सादिकने हे पैसे परत केले होते. काही दिवसानंतर सादिक याने सुहास ठाकूर याला आपल्यासोबत अवतारसिंगकडे नेले होते. त्याने एक महिन्याच्या मुदतीवर सुहासकरिता ३ लाख ५० हजार रुपये उसणे मागितले होते. मुदत संपूनही पैसे न मिळाल्याने अवतारसिंगने पैशासाठी तगादा लावला होता. घटनेच्या पूर्वी अवतारसिंग हा सादिकच्या घरी गेला होता. या ठिकाणी सुहास ठाकूर होता. याशिवाय त्याचा भाऊ प्रदीप याने आठ-दहा जण आपल्यासोबत आणले होते. परंतु सोबतच्या लोकांनी उलट सादिकला पैसे परत करण्यास सांगितले होते. काही वेळानंतर प्रदीप ठाकूर याने अवतारसिंगचा भाऊ रवींद्रसिंग याला पैशाबाबत बोलणी करण्यासाठी सक्करदरा चौकात बोलावले होते. लागलीच त्याने ठिकाण बदलवून त्यांना आयुर्वेद महाविद्यालयासमोर बोलावले होते. त्यानुसार रवींद्रसिंग, अवतारसिंग, सतपालसिंग, अमरिंदरसिंग आणि शिवशंकर कावरे हे झायलो मोटरगाडीने गेले होते. तेथे प्रदीप, सुहास, सादिक आणि रजत, असे चौघे जण होते. त्यापैकी प्रदीप आणि सुहास यांनी चाकूने हल्ला करून सतपाल आणि रवींद्रसिंग यांना गंभीर जखमी केले होते. इतर आरोपींनी झायलोवर दगडफेक केली होती. रहाटे इस्पितळात सतपालसिंगचा मृत्यू झाला होता. सक्करदरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली होती. त्यापैकी सुहास आणि प्रदीप ठाकूर यांनी केलेला अर्ज फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील राजेंद्र मेंढे यांनी काम पाहिले.