मुखपत्रातून सडेतोड टीका : बेदींना पक्षात आणणे का भाग पडले?नवी दिल्ली : दिल्लीतील राजकीय हवा अनुकूल नसल्यामुळे आणि जनतेकडून मिळणारा प्रतिकूल प्रतिसाद लक्षात घेऊनच भाजपाने किरण बेदींना पक्षप्रवेश देत थेट मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार बनविले, अशी सडेतोड व खरमरीत टीका करणारी मीमांसा रा.स्व. संघाने ‘आॅर्गनायझर’ या इंग्रजी मुखपत्रातून केली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही आम आदमी पार्टीने जनतेचा विश्वास परत मिळवण्यात यश मिळविल्याचा दावाही त्यात केला आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुकीची हवा तापलेली असून, सर्वच पक्ष मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यास रस्त्यांवर उतरले आहेत. अशा स्थितीत भाजपाला हा घरचा अहेर मिळाला आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान बेदींचा चेहरा पुढे घेऊन चाललेल्या भाजपासमोर ऐन मतदानाच्या तोंडावर अडचणी वाढण्याची शक्यता आहे.अनुकूल बदल, पण नकारात्मक प्रतिक्रियांची काळजी घेण्याचा सल्लाअवघ्या ४९ दिवसांत अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे ‘आप’च्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. या पक्षाला सत्तेवर आणून फसवणूक झाल्याची भावना मध्यमवर्गीयांमध्ये निर्माण झाली. अशा परिस्थितीत नव्याने लोकांना सामोरे जाण्याचे आव्हान आपच्या समोर निर्माण झाले असतानाच भाजपालाही स्थिती अनुकूल नव्हती. भाजपाच्या नेतृत्वाने राजधानीतून मिळत असलेला विपरीत प्रतिसाद बघून किरण बेदींना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून समोर आणले, असे ‘आॅर्गनायझर’मधील लेखात नमूद आहे.च्आॅर्गनायझरच्या दिल्ली ब्युरोने हा लेख लिहिला असून, बेदींचा पक्षप्रवेश आणि मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून निवडीने प्रारंभी भाजपामध्ये असंतोष उफाळल्याचे मात्र नंतर परिस्थितीत सुधारणा घडवून आणल्याचा दावाही त्यात केला आहे. बेदींचा पक्षप्रवेश हे भाजपाचे निश्चितच सकारात्मक पाऊल असल्याचे राजकीय विश्लेषकांचे भाष्यही त्यात दिले आहे. च्प्रचारात स्टार प्रचारक आणि मनुष्यबळाचा वापर करताना पक्षनेत्यांकडून होत असलेल्या नकारात्मक प्रतिक्रियांबाबत सावधगिरीचा सल्लाही त्यात दिला आहे. मोदींनी सोशल मीडियाच्या वापरावर अधिक भर दिला असला तरी नकारात्मक प्रतिक्रियांबाबत काळजी घेतली जावी, असे लेखात म्हटले आहे. आपचे सामर्थ्य कशात?आपने सातत्याने जनतेशी संपर्क राखला. प्रस्थापितांविरोधी भावनेमुळे या पक्षाला बऱ्याच प्रमाणात गमावलेला जनाधार परत मिळविण्यात यश आले. सार्वत्रिक निवडणुकीत मोठा फटका बसूनही दिल्ली कॅन्टोनमेंट बोर्डाच्या निवडणुकीत या पक्षाला कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात जमवाजमव करता आली. त्यामुळेच या पक्षाने बूथ स्तरावर पकड मजबूत केली असल्याची बाबही या लेखात स्पष्ट केलेली आहे.ओबामांची भेट फलदायी...मोदींची जादू प्रत्यक्षात येण्याबद्दलची दिल्लीवासीयांना उत्सुकता आहे यात शंका नाही. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या तीन दिवसीय भारतभेटीनंतर व्यापार आघाडीवर घडवून आलेला बदल भाजपाला अनुकूल ठरला असल्याचा दावाही लेखात केला आहे.
भाजपाला संघाचा अहेर!
By admin | Updated: February 4, 2015 03:21 IST