ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - प्रजासत्ताक दिनी मोदी सरकारच्या वादग्रस्त जाहिरातीचे प्रकरण ताजे असतानाच दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने आणखी एक वादग्रस्त जाहिरात दिली आहे. आम आदमी पक्ष व काँग्रेसवर टीका करणा-या या जाहिरातीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या फोटोला चक्क हार घातल्याचे दाखवण्यात आले आहे. यामुळे भाजपाची बौद्धिक दिवाळखोरी सुरुच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीनिमित्त भाजपाने एक जाहिरात दिली आहे. या जाहिरातीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेससोबत लग्न केल्याचे दाखवण्यात आले असून यात ते त्यांच्या मुलांच्या डोक्यावर हात ठेऊन शपथ घेताना दिसत आहेत. या चित्रात भिंतीवर अण्णा हजारेंचा फोटो असून या फोटोला हार घालण्यात आला आहे. केजरीवाल यांनी अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून काँग्रेसवर टीकेची झोड उठवली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांनी मुलांची शपथ घेत काँग्रेस आणि भाजपासोबत जाणार नाही असे म्हटले होते. मात्र सत्तास्थापनेसाठी केजरीवाल यांना अखेर काँग्रेसचाच आधार घ्यावा लागला होता. भाजपाने या जाहिरातीमधून याच मुद्द्यावर केजरीवाल यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र टीका करताना अण्णा हजारेंच्या फोटोला हार घालून भाजपाने वाद निर्माण केला. अण्णा हजारेंच्या फोटोला हार घालणा-या भाजपाने माफी मागायला हवी अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.