ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २६ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या गुजरातमधील वडोदरा पोटनिवडणुकीसाठी भाजपाने महिलेला उमेदवारी दिली आहे. वडोदराच्या उपमहापौर रंजन बेन भट्ट यांना लोकसभेत पाठविण्याचा भाजपाने निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वडोदरा आणि वाराणसी या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडूण आले होते. मोदी यांनी वाराणसी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्याचे ठरवित वडोदरा जागेचा राजीनामा दिला होता. या जागेवर पोटनिवडणुका होणार असून भाजपाने वडोदरा पोटनिवडणुकीसाठी रंजन बेन भट्ट यांना उमेदवारी दिली तर मणिनगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी स्थानिक नगरसेवक सुरेश पटेल यांना भाजपाने मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तरप्रदेशातील मैनपूरी पोटनिवडणुकीसाठी भाजपाने प्रेम सिंग शाक्य यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंग यादव यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे. उत्तरप्रदेशातील ११ जागांसाठी, गुजरात ९, राजस्थान ४, आसाम ३, पश्चिम बंगाल २, तर छत्तीसगड, सिक्कीम, त्रिपुरा आणि आंध्रप्रदेशमधील प्रत्येकी एका जागेवर पोटनिवडणुका होणार आहे. आंध्रप्रदेशातील मेडक, गुजरातमधील वडोदरा, उत्तरप्रदेशातील मैनपूरी या ठिकाणी लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या सर्व जागांसाठी १३ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून १६ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट आहे.