ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. २१ - राजस्थानमधल्या एका आमदारपुत्राने शिपाई होण्यासाठी अर्ज केला असून, तो अल्पशिक्षित असल्याने त्याने त्याच्या वकुबानुसार व पात्रतेनुसार काम करावे असा सल्ला आमदारांनी दिल्याचे वृत्त आहे. हीरालाल वर्मा हे भाजपाचे आमदार असून त्यांचा मुलगा हंसराज याने अजमेर येथल्या कृषी उपज मंडीमध्ये शिपाईपदासाठी अर्ज केला आहे. यासंदर्भात बोलताना वर्मा म्हणाले की हंसराज दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलेला नाही. त्यामुळे मी त्याला त्याच्या कुवतीपेक्षा जास्त काही करू देण्यास वा राजकारणात उतरण्यास प्रोत्साहन देणार नाही. सध्या तो पाच हजार रुपयांच्या पगारावर एका ठिकाणी नोकरी करत आहे, यापुढेही त्याने त्याच्या वकुबानुसार व कर्तृत्वानुसार काम करावे असाच माझा सल्ला राहील.
विशेष म्हणजे दोन वेळा आमदार झालेले वर्मा मागासवर्गीय आहेत. काही आमदारांनी मुलगा शिपाई होत असल्याबद्दल विचारणा केली असता माझा मुलगा जे काही करत आहे ते वेगळं आहे, परंतु त्यात काही गैर नाही असंही ते म्हणाले. प्रमाणिकपणे आयुष्य जगणं सगळ्यात महत्त्वाचं असल्याचं वर्मा यांनी सांगितलं असून वैभवशाली जीवनासाठी चुकीच्या मार्गानं जाण्याचा सल्ला मी माझ्या मुलांना देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. माझ्या मुलाने मुलाखत दिलेली असली तरी भरती प्रक्रिया पारदर्शक असायला हवी आणि त्याला त्याच्या पात्रतेनुसारच नोकरी मिळायला हवी असंही वर्मा म्हणाले. वर्मा स्वत: पदव्युत्तर शिक्षित असून सुवर्णपदक विजेते आहेत. वर्मांचा एक मुलगा उद्योजक आहे, एक मुलगा पदवीधर असून तो स्पर्धापरीक्षांची तयारी करत आहे तर मुलगी बीएड करत आहे.