पारडी बाजारासाठी भांडेवाडीत जमीन
By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST
हायकोर्टात माहिती : मनपाला परीक्षण करण्याचे निर्देश
पारडी बाजारासाठी भांडेवाडीत जमीन
हायकोर्टात माहिती : मनपाला परीक्षण करण्याचे निर्देशनागपूर : भंडारा रोडवरील अनधिकृत पारडी बाजार स्थानांतरित करण्यासाठी भांडेवाडीत १.३७ हेक्टर जमीन (खसरा क्र. ११) उपलब्ध असून मालक ललिता डेव्हलपर्सने जमीन विकासाकरिता हस्तांतरित करण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती महापालिकेने बुधवारी हायकोर्टाला दिली. ही बाब लक्षात घेता हायकोर्टाने जमिनीचे परीक्षण करून एक आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मनपाला दिलेत. भंडारा रोडवरील अव्यवस्थेसंदर्भात व्यावसायिक अनिल आग्रे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. समस्यांवर उपाय शोधण्यासाठी न्यायालयाच्या आदेशान्वये मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. परंतु, त्याचा विशेष फायदा होताना दिसत नाही. रोडवर आताही नियमित बाजार भरतो. फेरीवाले उभे राहतात. दोन्ही बाजूच्या फुटपाथवर मेकॅनिकल्सचा ताबा आहे. रोडच्या दोन्ही बाजूला २४ तास ट्रक उभे असतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. रोडला लागून मद्यविक्रीची सहा दुकाने आहेत. परिणामी स्त्रियांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागतो. दुपारी ३ ते रात्री ९ वाजतापर्यंतची परिस्थिती अत्यंत भयंकर असते, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली.