शिवनेरीवरुन पालखी सोहळ्याला सुरुवात
By admin | Updated: May 25, 2015 02:11 IST
शिवराज्याभिषक दिन : तुतारीचा निनाद आणि ढोलताशांचा गजर
शिवनेरीवरुन पालखी सोहळ्याला सुरुवात
शिवराज्याभिषक दिन : तुतारीचा निनाद आणि ढोलताशांचा गजरपुणे : रणरणत्या उन्हात ५१ तुतारी वादकांच्या ललकारी, ढोल ताशांच्या गजरात जय भवानी जय शिवाजीच्या घोषात रविवारी सकाळी शिवनेरी किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे उत्साहाच्या वातावरणात रायगडाकडे प्रस्थान केले. शिव धनुष्य प्रतिष्ठान व श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज पायी पालखी सोहळ्यातर्फे शिवनेरी ते रायगड किल्ल्यापर्यंत पायी पालखी सोहळा २४ मे ते ६ जून या कालावधीत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित केला आहे. सर्व शिवभक्त व शिवप्रेमी या सोहळ्यात उत्साहाने सहभागी होतात. पायी पालखी सोहळ्याचे यंदा हे दुसरे वर्ष आहे.प्रतिष्ठानचे शिवभक्त सकाळपासून शिवनेरी गडावर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळापासून सकाळी ११.३० वाजता पायी सोहळ्यास प्रारंभ झाला. किल्ले अभ्यासक, इतिहास संशोधक प्रमोद मांडे यांच्या हस्ते सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३२ किलो वजनाच्या पितळी मूर्तीची पूजा करण्यात आली. या वेळी ५१ तुतारी वादकांनी ललकारी देत शिवरायांना सलामी दिली.शिवजयंती महोत्सव समितीचे प्रमुख अमित गायकवाड, पराग मते, दीपा सणस, शिव धनुष्य प्रतिष्ठान पायी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष विनायक कालेकर, नितीन हेंद्रे यांच्यासह शेकडो शिवभक्त उपस्थित होते.यानंतर छत्रपतींच्या मूर्तीची शिवभक्तानी शिव आरती केली. यानंतर फुलांनी सजविलेल्या पालखीत छत्रपतीची मूर्ती विराजमान झाली. तेथून ढोल-ताशांच्या गजरात छत्रपतींच्या नामघोषात कार्यकर्त्यांनी पालखी शिवाई देवीच्या मंदिरात नेली. तिथे पारंपरिक पद्धतीने पूजा केल्यानंतर तेथून चांदीच्या पालखीत छत्रपतींची मूर्ती ठेवण्यात आली. यानंतर शिवभक्तांच्या जयघोषात पालखी नारायण गावाकडे मुक्कामासाठी गेली. -----