पणजी : गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. सत्ता हाती नसल्याने गोव्यात पक्ष चालविणेही राष्ट्रवादी काँग्रेसला अत्यंत कठीण होऊन बसले आहे. आर्थिक संटकाविषयी चर्चा करणे व प्रदेशाध्यक्षपदाच्या विषयाबाबत सोक्षमोक्ष लावणे, या हेतूने राष्ट्रवादीने केंद्रीय निरीक्षक भास्कर जाधव यांना गोव्यात पाचारण करण्याचे ठरविले आहे. येत्या १४ रोजी जाधव गोव्यात दाखल होत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या पणजीतील कार्यालयाचे भाडे गेले नऊ महिने थकले आहे. दरमहा ७५ हजार रुपयांच्या भाडेपट्टीवर पणजीत राष्ट्रवादीने कार्यालय घेतले होते. त्या वेळी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे राष्ट्रवादीच्या गोवा शाखेचे निरीक्षक होते. केसरकर यांनी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नीळकंठ हळर्णकर यांच्याशी चर्चा करून कार्यालय घेतले होते. केसरकर हे राष्ट्रवादीस रामराम ठोकून शिवसेनेत गेले. राष्ट्रवादीच्या गोवा शाखेचा खर्च करण्यासाठी तसेच राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे भाडे देण्यासाठी आता पक्षाकडे कुणीच नाही.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोव्यात सत्तेत असताना हळर्णकर आणि जुझे फिलिप डिसोझा हे मंत्री होते. त्यामुळे आता त्या दोघांनीही मिळून कार्यालयाचे भाडे फेडणे व पक्षाचा अन्य खर्च करावा, अशी सूचना पक्षाचे केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वी केली आहे. ही सूचना हळर्णकर यांना मान्य झाली नाही. त्यांनी प्रदेशाध्यक्षपदच सोडले. आता जुझे फिलिप डिसोझा यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारून गोव्यातील राष्ट्रवादीला आर्थिक संकटातून बाहेर काढावे, असे पक्षातील काही जणांना वाटते. मात्र, त्याबाबत अजून तोडगा निघालेला नाही. जुझे फिलिप डिसोझा यांना प्रदेशाध्यक्षपद देणे निश्चित आहे; पण भास्कर जाधव हे येत्या १४ रोजी त्याबाबत स्वत:ची भूमिका मांडणार आहेत. जाधव तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेवीना जुझे फिलिप डिसोझा यांच्या नेतृत्वास मंजुरी मिळणार नाही. जाधव हे महाराष्ट्राचे माजी मंत्री आहेत. गोव्यातील राष्ट्रवादीचा खर्च करण्याची जबाबदारी त्यांच्यावरही सोपविली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)
‘राष्ट्रवादी’ची अस्तित्वाची लढाई
By admin | Updated: March 7, 2015 01:22 IST