ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. २४ - धर्मांतरावरुन निर्माण झालेला वाद शमण्याची चिन्हे नसून आता बजरंग दलाने बांग्लादेशींना धर्मांतर करण्याचा इशारा दिला आहे. बांग्लादेशींनी धर्मांतर करावे अन्यथा देश सोडावा असा धमकीवजा इशाराच मेरठमधील बजरंग दलाचे नेते बलराज डुंगर यांनी दिला आहे. विशेष म्हणजे बलराज डुंगर यांच्या विधानाशी विहिंप नेत्यांनीच असहमती दर्शवली आहे.
धर्मांतरावरुन निर्माण झालेल्या वादामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली व हिंदूत्ववादी संघटनांनी 'घर वापसी' या कार्यक्रमाला स्थगिती दिली. मात्र मोदींनी नाराजी दर्शवूनही हिंदूत्ववादी नेत्यांनी वादग्रस्त विधानांची मालिका सुरुच ठेवली आहे. मंगळवारी मेरठमधील बजंरग दलाचे नेते बलराज डुंगर म्हणाले, ४३ वर्षांपूर्वी अनेक बांग्लादेशी भारतात आले, बांग्लादेश युद्धानंतरही ते पुन्हा मायदेशी परतले नाहीत. या बांग्लादेशींनी देश सोडावा अन्यथा हिंदू धर्म स्वीकारावा, त्यामुळे किमान हिंदू धर्मीयांची संख्या तरी वाढेल असे वादग्रस्त स्पष्टीकरणही त्यांनी दिले. विश्व हिंदू परिषदेचे सुदर्शनचक्र यांनी डुंगर यांच्या विधानाशी असहमती दिली. सरकारी आकडेवारीनुसार भारतात लाखो बांग्लादेशी राहत असून त्यांच्यामुळे भारतातील गुन्हेगारी कारवाया वाढत आहेत, भारतविरोधी कृत्यांमध्ये त्यांचा समावेश असतो, त्यामुळे त्यांच्या धर्मांतराचा प्रश्नच निर्माण होत नाही. सर्व बांग्लादेशींनी भारत सोडावे हीच आमची भूमिका असल्याचे सुदर्शनचक्र यांनी सांगितले.