विशाखापट्टणम : हुडहुड चक्रीवादळाने विशाखापट्टणममध्ये झालेल्या विध्वंसानंतर आता शहरातील नागरिकांना दूध, पिण्याचे पाणी, भाजीपाला आणि पेट्रोलसारख्या आवश्यक वस्तूंच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. येथे वीज पुरवठाही अद्याप सुरू झालेला नाही. पिण्याचे पाणी आणि दूध मिळत नसल्याची तक्रार काही रहिवाशांनी केली आहे. पेट्रोल पंपांवरही लोकांच्या दीर्घ रांगा दृष्टीस पडल्या. आजवरच्या आयुष्यात एवढी वाईट स्थिती कधीही अनुभवली नव्हती, असे संतप्त नागरिक सांगत आहेत. दूध आणि पिण्याच्या पाण्याची किंमत २० रुपये लिटर आहे. परंतु ते ५० रुपये दराने विकले जात आहे. काळाबाजार करणारे नागरिकांच्या अडचणीचा गैरफायदा घेत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी ‘हुडहुड’ या चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमला भेट देत, नुकसानाची पाहणी केली़ यावेळी चक्रीवादळामुळे प्रभावित आंध्रसाठी त्यांनी एक हजार कोटी रुपयांची अंतरिम मदत जाहीर केली़ चक्रीवादळातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदतीची घोषणाही त्यांनी यावेळी केली़आवश्यक गरजांना प्राधान्यविशाखापट्टणममधील चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मोदींनी आंध्र प्रदेशला सर्वाेतोपरी मदतीचे आश्वासन दिले़ नुकसानाची पूर्ण पाहणी अद्याप बाकी आहे़ या पाहणी तसेच पुनर्वसन कार्यासाठी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयाचे अधिकारी लवकर राज्याचा दौरा करतील़ पाणी आणि वीज यासारख्या आवश्यक गरजा पूर्ववत करण्यास सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे त्यांनी सांगितले़ (वृत्तसंस्था)
‘हुडहुड’ प्रभावित भागात कृत्रिम टंचाई
By admin | Updated: October 15, 2014 03:37 IST