नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलानंतर पंतप्रधान मोदी यांनी स्मृती इराणी यांना संसदीय कामकाज समितीतून वगळून पुन्हा धक्का दिला आहे. त्यासोबतच विदेशमंत्री सुषमा स्वराज यांचा पंतप्रधानांनी महत्त्वाच्या आर्थिक व्यवहार समितीतही समावेश केला आहे. याआधी राजनाथसिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि अन्य दिग्गजांचा समावेश असलेल्या या महत्त्वाच्या समितीत स्मृती इराणी यांचा समावेश करण्यात आला. तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या; मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा आणि या समितीतील समावेशाचा काहीही संबंध नव्हता. विविध मुद्द्यांवर तडाखेबाज उत्तर देण्यासाठी पक्षानेही त्यांना अनेकदा पुढे केले होते.परंतु काळ बदलला आणि त्यांचे भवितव्यही बदलल्याचे दिसते. ५ जुलैच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा फेरबदल करताना स्मृती इराणी यांच्याकडील वजनदार मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून घेत जबर धक्का देण्यात आला. आता पुन्हा धक्का देत पंतप्रधानांनी त्यांना संसदीय कामकाज समितीमधून वगळले आहे. सुषमा स्वराज या राजकीय व्यवहार आणि सुरक्षा या समितीच्या सदस्य असतानाही त्यांचा आर्थिक व्यवहार समितीत समावेश करण्यात आला आहे. हा फेरबदल पाहता सुषमा स्वराज पुन्हा सक्रिय राजकारणात दमदारपणे उतरल्या आहेत, असे दिसते.आर्थिक व्यवहार समिती अत्यंत महत्त्वाची आहे. ही समितीच सर्व आर्थिकविषयक निर्णय घेते, तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या समितीचे निर्णय येत नाहीत. गृहमंत्री राजनाथसिंह हे या समितीचे प्रमुख असून, जितेंद्र सिंग यांनी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी निवास व्यवस्था करण्याकामी थेट भूमिका निभवावी, अशी पंतप्रधानांची इच्छा दिसते. (लोकमत न्यूज नेटवर्क)पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री आणि ईशान्य विभागाचा स्वतंत्र प्रभार असलेले डॉ. जितेंद्र सिंग यांचा मंत्रिमंडळाच्या निवास व्यवस्था समितीवर विशेष निमंत्रक म्हणून समावेश करण्यात आला आहे. स्मृती इराणी यांना पुन्हा दुसरा धक्का देत पंतप्रधानांनी त्यांना संसदीय कामकाज समितीमधून वगळले आहे.
स्मृती इराणी यांना मोदी यांचा आणखी एक हादरा
By admin | Updated: July 16, 2016 02:50 IST