नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वी नगरोटा येथील टोलनाक्यावर झालेल्या चकमकीत लष्कराने पाकिस्तानमधून आलेल्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. हे दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून भारतात आल्याचे समोर आले होते. दरम्यान, या दहशतवाद्यांनी घुसखोरी केलेल्या ठिकाणाचा शोध लावण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी नियंत्रण रेषेखालून थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक मारल्याचे समोर आले आहे. नगरोटा येथे मारले गेलेले दहशतवादी भुयारातून भारतात घुसले होते. या भुयारांमधूनच भारताच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीमध्ये सुमारे २०० मीटरपर्यंत धडक मारली.केंद्र सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलांचे जवान पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीत सुमारे २०० मीटरपर्यंत आत गेले होते. हे जवान भुयाराच्या सुरुवातीपर्यंत पोहोचले होते. नगरोटा येथे मारल्या गेलेल्या चार दहशतवाद्यांनी याच भुयाराचा वापर करून भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती.
...आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी पुन्हा एकदा मारली पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक
By बाळकृष्ण परब | Updated: December 1, 2020 19:15 IST