नवी दिल्ली : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा अतुल्य भारत मोहिमेचे नवे ब्रॅण्ड अॅम्बेसडर असतील. यासंदर्भातील अधिकृत घोषणा २६ जानेवारीनंतर केली जाईल.केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेसाठी प्रथमच सरकारकडून ब्रॅण्ड अॅम्बेसडरची थेट नियुक्ती करण्यात येत आहे. यापूर्वी ‘अतिथी देवो भव’या मोहिमेसाठी आम्ही मॅक्केन वर्ल्डवाईड या संस्थेसोबत करार केला होता,अशी माहिती पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी दिली होती. बीग बी आणि प्रियंका यांची तीन वर्षांकरिता नियुक्ती करण्यात येणार असून यासाठी त्यांना कुठलेही शुल्क दिले जाणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अतुल्य भारतच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडरसाठी पर्यटन मंत्रालयाची पहिली पसंती अमिताभ बच्चन यांना होती. बच्चन कुठल्याही वादात गुंतले नसून ते गुजरातचे ब्रॅण्ड अॅम्बेसडर राहून चुकले आहेत,असे मंत्रालयाचे मत होते. हिंदी चित्रसृष्टीत मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान गेल्या १० वर्षांपासून ‘अतुल्य भारत’ चा ब्रॅण्ड अॅम्बेसडर होता. परंतु त्याचा करार संपला असल्याची माहिती पर्यटन मंत्रालयातर्फे अलीकडेच देण्यात आली. दरम्यान सरकारने कराराचे कारण पुढे केले असले तरी आमिरने देशात वाढत्या असहिष्णुतेबाबत केलेल्या वक्तव्यामुळेच त्याला हटविण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अमिताभ, प्रियंका ‘अतुल्य भारत’चे नवे ब्रॅण्ड अॅम्बेसडर
By admin | Updated: January 22, 2016 02:41 IST