Amit Shah on Operation Mahadev : लोकसभेत दुसऱ्या दिवशीही ऑपरेशन सिंदूरवर विशेष चर्चा सुरू आहे. मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑपरेशन महादेवमध्ये पहलगाम हल्ल्याला जबाबदार असणारे तिन्ही दहशतवादी मारले गेल्याची माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑपरेशन महादेवमध्ये सुलेमान उर्फ फैजल अफगाण आणि जिब्रान हे तीन दहशतवादी भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मारले गेल्याचे सांगितले. सुलेमान हा लष्कर-ए-तोयबाचा ए-ग्रेड कमांडर होता. अफगाण हा लष्कर-ए-तैयबाचा ए-ग्रेड दहशतवादी होता आणि जिब्रान देखील ए-ग्रेड दहशतवादी होता. या तीन दहशतवादीनी बैसरन खोऱ्यात आपल्या नागरिकांची हत्या केली होती असंही अमित शाह म्हणाले.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तिन्ही दशहतवाद्यांना कसं मारलं आणि त्याची तयारी कधीपासून सुरु होती याची सविस्तर माहिती दिली. मे महिन्यापासून दहशतावाद्यांवर पाळत ठेवण्यात आल्याचे अमित शाह म्हणाले. यासोबत दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी रायफलींची चाचणी केल्याचेही त्यांनी सांगितले. या दहशतवाद्यांच्या रायफली रात्री विमानाने चंदीगडला पाठवण्यात आलं.
"ज्यांनी बैसरन व्हॅलीमध्ये आपल्या नागरिकांना मारलं होतं तेच हे तीन दहशतवादी होते आणि तिघेही मारले गेलेले आहेत. या कारवाईत पॅरा ४चे, सीआरपीएफचे ९२ जवान आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे जवान सामील होते. त्या सर्वांचे देशाच्या वतीने आभार मानतो. ऑपरेशन महादेवची सुरुवात २२ मे रोजी झाली. ज्या दिवशी पर्यटकांची हत्या झाली त्याच दिवशी रात्री एक सुरक्षा बैठक घेण्यात आली होती. एक वाजता हल्ला झाल्यानंतर मी साडेपाच वाजता जम्मू काश्मीरमध्ये होतो. २३ एप्रिल रोजी सर्व सुरक्षा दलांची एक बैठक घेण्यात आली. त्यात दशतवाद्यांना पाकिस्तानात पळू जाता येणार नाही याची आम्ही काळजी घेतली. २२ मे रोजी आयबीकडे एक गुप्त माहिती आली. दाचीगाम येथे दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. आयबी आणि सैन्याद्वारे दाचिगाममध्ये अल्ट्रा सिग्नल कॅप्चर करण्यासाठी मे पासून २२ जुलै पर्यंत सातत्याने प्रयत्न केले गेले. थंडीत उंचीवर आपले अधिकारी हे सिग्नल मिळवण्यासाठी फिरत होते.२२ जुलै रोजी सेन्सरद्वारे तिथे दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. तेव्हा पॅरा ४ चे जवान, सीआरपीएफच्या जवानांनी या दहशतवाद्यांना घेरलं. त्यानंतर सोमवारी झालेल्या कारवाईत आपल्या निर्दोष नागरिकांना मारणाऱ्या तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आलं," असं अमित शाह म्हणाले.
"सुलेमान उर्फ फैजल, अफगाण आणि जिब्रा अशी तिघांची नावे आहेत. एनआयएने त्यांना जेवण पुरवणाऱ्या लोकांना स्वतःच्या ताब्यात ठेवलं होतं. जेव्हा दहशवाद्यांचे मृतदेह श्रीनगर येथे आणण्यात आले तेव्हा त्यांची ओळख पटवण्यात आली. चार लोकांनी हे तेच दहशतवादी असल्याचे ओळखले. पण आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. आम्ही पहलगाममध्ये जी काडतुसे मिळाली होती त्याचा एफएसएल अहवाल आधीच तयार करुन ठेवला होता. चंदीगड एफएसएल सेंटरमध्ये बॅलेस्टिक रिपोर्टच्या आधारे अहवाल तयार होता. सोमवारी मारले गेलेल्या दहशतावाद्यांच्या रायफली जप्त करण्यात आल्या. त्यात एक एम ९ अमेरिकन रायफल आणि दोन एके ४७ रायफल होत्या. पहगलगाममध्ये मिळालेली काडतुसे एम ९ आणि एके ४७ चे होते. त्या रायफली रात्री १२ वाजता विमानाने चंदीगडला पाठवण्यात आल्या. रात्रभर फायरिंग करुन त्यांची काडतुसे मिळवली. दोन्ही काडतुसे तपासून पाहिली. तेव्हाच स्पष्ट झालं की या तिन्ही रायफलींनी आपल्या निष्पाप नागरिकांची हत्या झाली होती," असंही अमित शाह यांनी सांगितले.