ऑनलाइन लोकमत
मालदा (पश्चिम बंगाल), दि. १७ - महिला फुटबॉलपटूंच्या कपड्यांवर मौलवींनी आक्षेप घेतल्याने पश्चिम बंगाल सरकारने मालदा जिल्ह्यातील महिलांसाठी आयोजित केलेला फुटबॉल सामन्याला परवानगी नाकारल्याचे समोर आले आहे. ममता बॅनर्जी सरकारच्या या निर्णयावरुन क्रीडा प्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनीदेखील या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.
मालदासारख्या ग्रामीण भागातील महिलांना फुटबॉलकडे आकर्षित करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह यूथ क्लबतर्फे फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यात कोलकाता व राष्ट्रीय पातळीवर खेळणा-या महिला फुटबॉलपटू सहभागी होणार होत्या. या सामन्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील काही महिला खेळाडू मालदा येथे दाखलही झाल्या होत्या. मात्र आयत्या वेळी स्थानिक गट विकास अधिका-यांनी सामन्याला परवानगी नाकारली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे सांगत प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. मालदा हा मुस्लीम बहुल भाग असून या समाजातील मौलवींनी महिलांच्या फुटबॉल सामन्यांवर आक्षेप घेतला होता. फुटबॉल सामन्यातील महिला खेळाडूंच्या कपड्यांवर या मौलवींनी आक्षेप होता. याशिवाय फुटबॉल खेळणे हे शरियत कायद्याच्या विरोधात असल्याचा सूरही काही मौलवींनी लगावला. या मौलवींच्या दबावापुढे नमते घेत स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली नाही असा आरोप आयोजकांनी केला आहे.