ऑनलाइन टीम
सूरजकूंड, दि. २९- भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणींनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भरभरुन कौतुक करत त्यांची तुलना क्रिकेटपटूशी केली. पहिल्याच सामन्यात कर्णधारपदासोबतच त्रिशतक ठोकणारा क्रिकेटपटू आजपर्यंत बघितला नाही असे सांगत आडवाणींनी मोदींची पाठ थोपटली आहे.
हरियाणातील सूरजकूंड येथे भाजपच्या नवनिर्वाचित खासदारांसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी या शिबीराच्या समारोप कार्यक्रमात लालकृष्ण आडवाणींनी खासदारांना मार्गदर्शन केले. खासदारांना मार्गदर्शन करतानाच आडवाणींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. '२००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप पुन्हा सत्तेवर यावे अशी स्वप्न आम्ही बघायचो. नरेंद्र मोदींनी हे स्वप्न प्रत्यक्षात आणून दाखवले. टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्याच सामन्यात शतक, द्विशतक झळकावणारे आपण अनेक फलंदाज बघितले. मात्र पहिल्याच कसोटी सामन्यात कर्णधारपदावर विराजमान होऊन त्रिशतक ठोकणारा फलंदाज बघितला नाही असे आडवाणींनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या ३०० हून अधिक जागांचा दाखला देत त्यांनी हे विधान केले.
केंद्रीय मंत्रिमंडळाची कामगिरीही चांगली असून हे केवळ एका नेत्याचे यश नसून टीम मोदीचे यश आहे असेही आडवाणींनी स्पष्ट केले. पक्षाच्या सर्व खासदारांनी जबाबदारीने वागून सरकारने आर्थिक क्षेत्रात कठोर निर्णय का घेतले याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायला हवी असेही आडवाणींनी नमूद केले.