ऑनलाइन लोकमत
गुवाहाटी, दि. २४ - सोनितपूर आणि कोक्राझार जिल्ह्यात अतिरेक्यांनी हल्ला करून ६० हून अधिक नागरिकांना निर्घृणपणे ठार मारल्यामुळे स्थानिक आदिवासी संतप्त झाले आहेत. या हल्ल्याचा निषेध करणारे आदिवासी व पोलिसांत चकमक झाली, ज्यात पाच आदिवासी ठार झाले. पोलिसांच्या गोळीबारात ठार झाले आहेत. पोलिस व आदिवासींमधील धुमश्चक्री अद्याप कायम आहे.
मंगळवारी संध्याकाळी एनडीएफबीच्या अतिरेक्यांनी बेछुट गोळीबार करत निष्पाप नागरिकांचे प्राण घेतले. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आदिवासींनी आंदोलन करत सोनितपूर जिल्ह्यातील फुलगौरी भागातील बोडो नागरिकांवर चालून जात त्यांची घेर जाळली. सशस्त्र पोलिसांनी संतप्त आदिवासींना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. शेवटी पोलिसांना गोळीबार करावा लागला ज्यात पाच आदिवासी मृत्यूमुखी पडले आणि परिस्थिती आणखीनच चिघळली.
दरम्यान सोनितपूर आणि कोक्राझार जिल्ह्यात चार ठिकाणी एनडीएफबीच्या अतिरेक्यांनी मंगळवारी संध्याकाळी उच्छाद मांडला, त्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या मालिकेतील ६० हून अधिक नागरिक ठार झाले आहेत. काल संध्याकाळी अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार करत निष्पाप नागरिकांना लक्ष्य केले.
एनडीएफबीच्या अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार करीत एकट्या सोनितपूरमध्ये ३० जणांना ठार केले. त्यात विश्वनाथ चारीयाली व धेकियाजुली येथील अनेक नागरिकांचा समावेश आहे. तर कोक्राझारमध्ये चार आदिवासी मारले गेले. हल्ला झाला ते स्थळ आसाम आणि अरुणाचल च्या सीमेजवळ आहे. कोक्राझारच्या उल्टापानी या भागात नक्षलवाद्यांनी सहा ग्रेनेडचा स्फोट घडवला.
दरम्यान आसाममधील माओवाद्यांचे कृत्य दहशतवाद्यांसारखे, त्यांना दहशतवादी म्हणूनच हाताळायला हवे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. आसाममध्ये केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची तुकडी पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.