ऑनलाइनल लोकमत
भोपाळ, दि. २९ - पतीने शाहरुख खानचा 'हॅपी न्यू इयर' हा चित्रपट बघू न दिल्याने निराश झालेल्या पत्नीने अॅसिड प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशमध्ये घडली आहे. त्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिच्या शरीरातील अंतर्गत भागांमध्ये गंभीर दुखापत झाली आहे.
शिवपुरी जिल्ह्यातील खनियाधारा येथे राहणारी नेहा सेन (वय २१) या विवाहीतेचा पती विशाल हा 'हॅपी न्यू इयर' चित्रपट बघण्यासाठी एकटाच गेला होता. सिनेमागृहात गर्दी जास्त असल्याचे कारण देत विशालने नेहाला सिनेमा बघायला नेले नाही. यामुळे नेहा निराश झाली व या नैराश्याच्या भरात नेहाने अॅसिड प्राशन केले. यानंतर नेहाच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने शिवपुरीतील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र अॅसिडमुळे तिच्या शरीरातील अंतर्गत भागांमध्ये गंभीर दुखापत झाल्याने तिला ग्वाल्हेरमधील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सखोल चौकशी करुनच नेहाच्या पतीविरोधात कारवाईचा निर्णय घेऊ असेही पोलिसांनी स्पष्ट केले.