ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्षांचा ९० टक्के निधी हा उद्योग आणि कॉर्पोरेट क्षेत्रातून येत असल्याची माहिती उघड झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप या राष्ट्रीय पक्षांनी निधीचा तपशील जाहीर केला असला तरी सत्ताधारी भाजपाने अद्याप निधीचा तपशील जाहीर करण्याची तसदी घेतलेली नाही.
बुधवारी असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस् या संशोधन संस्थेने राष्ट्रीय पक्षांच्या निधीसंदर्भात एक अहवाल जाहीर केला आहे. यामध्ये राजकीय पक्षांचा ९० टक्के निधी हा उद्योग समुहांकडून आल्याचे उघड झाले आहे. तर निवडणूक जवळ येताच राजकीय पक्षांच्या निधीमध्ये दुप्पटीने वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. २०१२ - १३ मध्ये काँग्रेसला ११ कोटी७२ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. २०१३ -१४ मध्ये हा आकडा थेट ५९ कोटी ५८ लाखपर्यंत पोहोचला. राष्ट्रवादी, भाकपा यांच्या उत्पन्नांमध्येही अशीच वाढ झाल्याचे एडीआरने म्हटले आहे. २०१२-१३ मध्ये भाजपाला८३ कोटी १९ लाख रुपये मिळाले होते. ही रक्कम काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप,माकप या पक्षांचा निधी एकत्र केल्यास त्यापेक्षाही जास्त असल्याचे संस्थेच्या पदाधिका-यांनी सांगितले. राजकीय पक्षांना उद्योग आणि कॉर्पोरेट क्षेत्रातून मिळणारा वाढता निधी ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंताजनक बाब असल्याचे जाणकारांनी सांगितले.
२०१३ -१४ या आर्थिक वर्षातील निधीचा तपशील जाहीर करण्याची ३१ ऑक्टोबर अंतिम तारीख होती. काँग्रेस व अन्य राष्ट्रीय पक्षांनी त्यांचा तपशील जाहीर केला असला तरी सत्ताधारी भाजपाने अद्याप पक्षनिधीची माहितीच जाहीर केलेली नाही असे एडीआरच्या अहवालात म्हटले आहे. सत्ताधा-यांची ही कृती दुर्दैवीच म्हणावी लागेल असे एडीआरने म्हटले आहे.